आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:26 PM2021-07-22T12:26:54+5:302021-07-22T12:34:30+5:30
डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे.
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये सलग दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भात खाचरांचे बांध फुटुन भात रोपे गाडली गेल्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर दरडी कोसळल्यामुळे वाहतुक बंद झाली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील सोमवारी पावसाला सुरुवात झाली. परंतु बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे. तर ह्या परिसरामध्ये ह्यावर्षी आतापर्यंत ४६७ मी.मी. पाऊस पडला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये काल दुपार पासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर पाटण व आहुपे खोर्यामध्ये भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंचर- भीमाशंकर ह्या राज्य मार्गावरील पोखरी घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
मंचर- भीमाशंकर ह्या राज्य मार्गावरील पोखरी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हा रस्ता आज सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद पडला आहे. बारा ज्योर्तिर्लींगापैकी एक असणार्या श्री क्षेञ भीमाशंकरकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे, खोर्याप्रमाणेच डिंभे परिसरामध्ये काल राञी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रस्त्यामध्ये मातीच्या ढीगार्यासह मोठमोठाले दगड आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला आहे.
सुमारे दोन तीन ठिकाणी मोठ्या दरडी पडल्या असून हा रस्ता पुर्ववत होण्यास वेळ जाणार आहे. तरी भीमाशंकर कडे जाणार्या लोकांनी दुपारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा प्रशासनाकडून ह्या दरडी काढण्यासाठी विविध मशनरी पाठवण्यात आल्या आहेत.