भोरगिरी आणि भिमाशंकर परिसरात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:34+5:302021-07-23T04:09:34+5:30
या परिसरात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. भोरगिरी, भिमाशंकर या परिसरात मागील १८ तासात जोरदार पाऊस ...
या परिसरात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती.
भोरगिरी, भिमाशंकर या परिसरात मागील १८ तासात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भिवेगाव, भोमाळे, टोकावडे, मंदोशी, मोरोशी, खरपूड, कुडे, नायफड,भोरगिरी, कारकुडी, धामणगाव खुर्द, शिरगाव या गावांच्या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील शेतकरी चक्रीवादळाच्या नुकसाणीतून कुठे सावरत असतानाच बुधवारी रात्री झालेल्या पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेताचे बांध वाहून गेले भात पिके गाडली गेली शेती उद्ध्वस्त झाली. भीमा नदीला महापूर आल्याने पाभे गावात पाणी शिरले होते.भोमाळे, पाभे गावातील भिमानदिवरील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने पुलाचे कठडे तुटले. संरक्षक खांब वाहून गेले. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असून भिमानदीचा पूर ओसरला आहे. मंदोशी गावाच्या जावळेवाडीतील नवा पूल वाहून गेल्याने नागरिकांना जाण्यायेण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. नायफड येथील माती बंधारा फुटल्याने बंधाऱ्याच्या पाण्याने व मातीने खाली असलेल्या शेताचे बांध, ताली, भातरोप असणारे २५ ते ३० शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्य कपडे चीजवस्तू व संसारोपयोगी वस्तू भिजुन गेल्या. गडदुबाई मंदिरासमोरील भराव पाऊसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे महसुल विभागाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदार डाँ.वैशाली वाघमारे, वाडा मंडलधिकारी शरद गोडे आणि तलाठी कर्मचाऱ्यांसह डेहणे भोरगिरी परीसरातील नुकसानग्रस्त भागाची पहाणी करुन नुकसानीचा अंदाज घेतला आहे.
कोट
तालुक्याच्या पश्चिम भागातअतिवृष्टी झाली होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाझर तलाव, शेतीचे बांध फुटून भात रोपे पिके मातीत गेली आहे. घरांमध्ये पाणी शिरले यासह पिकांचे मोठे नुकसान झाले पिकांसह नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रांत व तहसिलदार याच्याकडे केली आहे.
-अतुल देशमुख (जिल्हा परिषद ,सदस्य )
फोटो ओळ: नायफड येथे वाघदरा येथील मातीचा बंधारा पाऊसाने फुटून गेला.
फोटो ओळ: अतिवृष्टीने भात रोपे वाहून गेली.
फोटो ओळ: नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना तहसिलदार वैशाली वाघमारे.