भोर: भोर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पश्चिम भागातील महाड भोर व रिंगरोडवर दरडी पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच पुल वाहून गेला असून डोंगरातील दरडी पडून भात खाचरे वाहुन गेली. स्मशानभूमी आणि घराचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
भोर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भोर महाड रस्त्यावरील हिर्डोशी, वारवंड व शिरगाव दरडी पडून रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीने दरडी हटवण्याचे काम सुरु आहे. निरादेवघर धरणाच्या काठ रस्त्यावरील प-हर गावाजवळ दरड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. तर धानवली रायरी, कारी, कंकवाडी, गुढे निवंगण यासह अनेक डोंगरा खालील व ओढया नदी, नाले वाहनांच्या काठावरील गावात पावसाने दरडी पडून पाणी खाचरात जाऊन लागवड केलेली भात खाचरे गाळाने भरली आहेत.
भोरचा संपर्क तुटला
दरम्यान आंबवडे रायरेश्वर किल्ला रस्त्यावरील आंबवडे गावाजवळचा दगडी पूल वाहुन गेल्याने आंबवडे खो-यातील वाहतूक बंद आहे. पान्हवळ ते घोरपडेवाडी पुल वाहुन गेला आहे. दरड पडल्यामुळे साळुंगण येथील स्मशानभूमी दगड मातीच्या खाली गेली आहे. पोल्ट्रीतील पक्षी भरताना वीजेचा धक्का लागून मोहन अमृता घोरपडे याचा मृत्यू झाला आहे. सांगवी भिडे येथील पुल पाण्याखाली गेला आहे. निरानदीच्या पाण्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने भोर शहरातील पदमावती वस्तीत पाणी शिरले आहे. यामुळे भोरचा संपर्क तुटलेला आहे.