बारामतीत अतिमुसळधार पावसाने क-हा नदीला पूर; चोवीस कुटुंबांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:39 AM2022-10-18T09:39:01+5:302022-10-18T09:39:10+5:30
प्रशासनाने पहाटे पासून मदत कार्य हाती घेतले
बारामती : नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे बारामतीत क-हा नदीला पूर आला आहे. प्रशासनाने पहाटे पासून मदत कार्य हाती घेतले आहे. चव्हाण वस्तीवरील 3 कुटुंब स्थलांतरित केली आहेत.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पोहचत मदतकार्य हाती घेतले आहे .जळगाव कप मधील नदीकाठावरील २० कुटुंब स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. पुणे आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथक मागविले आहे. नाझरे धरणातून ३५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. त्यामुळे काही वेळाने मोरगाव बारामती रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्हा नदीत ३५ हजार २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
अतिमुसळधार पावसामुळे धरणात येणार्या पाण्यामुळे सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्हा नदीत सुरु असलेल्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. सध्या ३५२५० क्युसेक्स इतक्या दराने कर्हा नदीत विसर्ग चालू आहे. तरी कर्हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. नदी किनार्यावरील सखल भागातील नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.