चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 06:37 PM2021-10-31T18:37:54+5:302021-10-31T18:39:45+5:30
पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही
चाकण : चाकण चौकातील वाहतूककोंडी नित्याचाच प्रश्न आहे. दिवाळीमुळे तर यामध्ये आणखी भर पडणार असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यामध्ये १५ दिवसांसाठी सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत चाकणमधून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे सुरळीत वाहतुकीच्या चर्चेमुळे कोंडी झाली आहे.
पुणे - नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या मार्गावरील चाकण चौकातील वाहतूककोंडी हा गेल्या काही वर्षांपासून अतिशय कळीचा मुद्दा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर मोशी (इंद्रायणी नदी) ते चांडोली या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आगामी दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार कोल्हे यांनी चाकण वाहतूक विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची बैठक घेतली.
खासदार कोल्हे यांनी नागरिकांना दिवाळीच्या काळात वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी कंटेनरसह सर्व जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत बंद ठेवावी. तसेच तळेगाव चौकातील एसटी, पीएमटी व खासगी बसेसचे थांबे १०० मीटर पुढे नेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे चौकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर प्रवासी वाहनांना चौकापासून १०० मीटर हद्दीपर्यंत पार्किंग करण्यास मज्जाव करावा. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.
तळेगाव चौकाच्या चारही बाजूला रस्त्याला पडलेले खड्डे बुजविल्यास वाहनांना डावीकडे वळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असे सहायक पोलीस आयुक्त कट्टे यांनी सुचवताच खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम (नॅशनल हायवे विभाग) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून चौकातील वळणावरचे खड्डे तत्काळ बुजविण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
बैठकीतील चर्चेनुसार चाकणमधून ठरावीक वेळेला अवजड वाहनांना बंदी घातली तर त्याची पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. बैठकीतील चर्चेनुसार सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ४ ते ९ यावेळेत वाहने आली तर त्यांना थांबवायचे कोठे? पुण्यातून नाशिकला जाण्यासाठी चाकणचाच मार्ग आहे. तर दुसरीकडे मुंबईवरून येणाऱ्या वाहनांना वासुली फाटा रस्त्याचा पर्याय आहे. पण तो अरुंद असल्याने तेथे मोठे कंटेनर जाऊ शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याकडेला जर ही वाहने थांबली तर वाहतूककोंडीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.