... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 02:31 PM2022-09-10T14:31:39+5:302022-09-10T14:49:04+5:30

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

... Hence the delay in the immersion of Dagdusheth Ganapati, The trust said | ... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

... म्हणून दगडूशेठ गणपती बाप्पांच्या विसर्जनाला उशीर, ट्रस्टने सांगितलं कारण

googlenewsNext

पुणे - मोरया, मोरया... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या निनादाने लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला. अनंत चतुर्दशीला  'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये  विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले. वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच  श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. आज सकाळी ११.१५ वाजता दगडूशेठ गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीपेक्षा यंदा विसर्जनाला उशीर झाल्याचे ट्रस्टनेही मान्य केले.

पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा 'जय गणेश स्वच्छता अभियान रथ' बेलबाग चौकात दाखल झाला. 


बेलबाग चौकामध्ये सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी मुख्य श्री स्वानंदेश रथ दाखल झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर पोलीस अधिका-यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. त्यानंतर पुढे हा रथ मार्गस्थ झाला. श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला. रथावर ८ खांब साकारण्यात आले होते.  संपूर्ण रथावर तब्बल १४ शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या ५ कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईल मध्ये देखील अनेकांनी छायाचित्र टिपले. 

सकाळी ११.१५ वाजता विसर्जन

पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील पारंपरिक वेशात मोठया संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी श्रीं ची आरती व स्वागत देखील केले. टिळक चौकामध्ये सकाळी १० वाजून २५ मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया... जय गणेश असा जयघोष झाला. त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रीं चे विसर्जन झाले. 
 

Web Title: ... Hence the delay in the immersion of Dagdusheth Ganapati, The trust said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.