राजगुरुनगर : भूकेने व्याकुळ झालेल्या एका विमनस्क माणसाचा प्राण गेला. जवळपास ४ दिवस त्याचा मृतदेह घरात तसाच पडून होता. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा कुठलाही शोध न लागल्याने पोलिस व नागरिकांनी माणुसकी जपत या जीवाला शेवटचा निरोप दिला. या घटनेतून पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून 'पोलिसातील माणुसकी' आणि इतरांनी 'सामाजिक बांधिलकी' दाखवून दिली. या घटनेची शहरात चर्चा सुरू आहे.
खेड पोलिसांना पुणे-नाशिक महामार्गावर एकविरा देवी मंदिराजवळ एक बेवारस प्रेत पडलेलं असल्याची माहिती मिळते. ड्युटीवर ठाणे अंमलदार असलेले संजय नाडेकर आपल्या एका सहकाऱ्याला घेऊन घटनास्थळी पोहोचतात. एकविरा देवी मंदिराजवळ असलेल्या बांधकाम मजुरांच्या रिकाम्या पत्राशेडमध्ये अंदाजे पन्नास वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह पडलेला दिसतो. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोलिसांनी नातेवाईंकांचा शोध घेेणे सुुरु केले. पण नातेवाईकांचा दुपारपर्यंत कोणताही धागादोरा हाती न लागलेे नाही. संबंधित मनुष्य हा गेल्या अनेक दिवसांपासून इथे भंगार गोळा करून ते विकायचा आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. या दरम्यान तो आजारी पडला असेल आणि त्या आजारपणातच त्याचे निधन झाले असेल, असा अंंदाज व्यक्त करून मृृृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यावेळी समजले, की त्याला बरेच दिवस अन्नपाणी मिळाले नव्हते. बेवारस का असेना, परंतु भुकेने एखाद्याचे प्राण गेलेे हे समजल्यानंतर नाडेकर यांना अतिशय वाईट वाटले. त्यातच कोरोनाची साथ असल्याने पुढील सोपस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येईना.
नंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन आणि राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांच्याशी संपर्क करून येथील अमरधाम स्मशानभूमीच्या गॅस दाहिनीवर अंत्यविधी करण्याचे निश्चित केले. तर तेथेही दुसऱ्या अडचणीला सामोरे जावे लागले असते. ते म्हणजे अंत्यविधी करणारे दोन्ही कर्मचारी आजारी असल्यामुळे स्मशानभूमीचे व्यवस्थापन करण्यास कोणी नव्हते.
अशावेळी प्रदीप कासवा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गॅसदाहिनीची सर्व व्यवस्था तयार ठेवली. आणि सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे अंमलदार संजय नाडेकर, प्रविण गेंगजे , शेखर भोईर , राजेश नलावडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अमरज्योत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अमरधाम स्मशानभूमीचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रदीप कासवा, श्रीकांत गुजराथी, सागर मणियार,रवींद्र गुजराथी, निलेश संभूस यांनी या अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करून बेवारस मृतदेहाला अखेरचा निरोप दिला.