शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:21 AM2018-10-20T01:21:50+5:302018-10-20T01:21:51+5:30
कारवाईला स्थगिती : बीएलओ कामास दिला होता नकार
बारामती : अशैक्षणिक कामे नाकारणाऱ्या शिक्षकांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांना महसूल विभागाकडून अशैक्षणिक कामे दिली जात आहेत. त्यामुळे शालेय वेळ वाया जात होता. त्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने ‘बीएलओ’ काम नाकारलेल्या शिक्षकांवर कारवाईस स्थगिती दिली आहे.
याबाबत प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी माहिती दिली. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महापालिका शिक्षक संघाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिल्या जात असलेल्या या कामाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत बुधवारी (दि.१७) मुंबई उच्च न्यायालयात न्या. बी. आर. गवई व न्या. मकरंद कर्णीक यांच्यासमोर सुनावणी झाली.