‘लोणी काळभोर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:07 AM2018-03-05T05:07:02+5:302018-03-05T05:07:02+5:30
लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विश्वगुरूकुल विद्यालयात कॉपीच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुणे - लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विश्वगुरूकुल विद्यालयात कॉपीच्या संशयावरून बारावीच्या विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी करण्यात आल्याच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून तेथील शिक्षक व कर्मचाºयांकडून परीक्षेला बसण्यापूर्वी मुलींची तपासणी करण्यात येत होती. वास्तविक अशा प्रकारे कोणालाच शारीरिक तपासणी करण्याचा अधिकार नाही. फक्त बोर्डाच्या पथकालाच तपासणी करण्याचा अधिकार आहे. परीक्षा काळात महिला पोलीस अधिकाºयांची नेमणूक करावी, संस्थेच्या कर्मचाºयांवर कारवाई करून निलंबित करावे. प्रकरणाला पाठिशी घालणाºया संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी, संस्थेच्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करावी आदी मागण्या नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.
पालकांनी धमकावल्याची तक्रार : काही विद्यार्थ्यांना कॉपी न करू दिल्यामुळे पालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याची तक्रार शाळा प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. राज्य मंडळाकडेही लेखी तक्रार केली आहे. एका विद्यार्थिनीने तिला कॉपी न करू दिल्यामुळे खोट्या व विपर्यस्त तक्रारी देऊन, संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे संस्थेच्या प्रशासनाने सांगितले.