पुणे: स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवणारी मुलींची पहिली शाळा म्हणजेच भिडे वाडा अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. हे तर आपण जाणतोच. मात्र सध्या याच भिडे वाड्यात दारू, बिछाना अन् पार्ट्यांचा तमाशा उघडकीस आलाय!
ऐतिहासिक भिडे वाड्यात दारूच्या पार्ट्या आणि व्यसनांचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब ' लोकमत ' च्या पाहणीत पुढे आलीये. मोडकळीस आलेल्या भिडे वाड्याच्या खोल्यांमध्ये देशी- विदेशी दारूच्या बाटल्या, चिप्सचे पाकीटे, सिगारेटची थोटकं, जमिनीवर बिछाना, दोरीवर वाळत घातलेले कपडे असा सगळा प्रकार दिसून आलाय. हा वाडा पूर्णपणे दुर्लक्षित असल्यामुळे इथे खोल्यांमध्ये कुणीतरी वास्तव्यास असल्याचे हे पुरावे सापडले आहेत.
पुणे महापालिकेचं या ऐतिहसिक वाड्याकडे झालेलं दुर्लक्ष माध्यमांनी वेळोवेळी अधोरेखित केलं आहे. तरीही प्रशासनाला जराही फरक पडलेला नाही. आधीच दुरावस्थेत पडलेल्या भिडे वाड्याची डागडुजी तर सोडाच पण निदान आहे त्याकडेही कानाडोळा करण्याचं काम पुणे स्थानिक प्रशासनानं केलंय. भिडे वाडा ज्या परिसरात आहे त्याच वार्डात स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने राहतात. मात्र तेच काय तर लोकप्रतिनिधींनीही भिडे वाड्याकडे पाठ फिरवली आहे.
या वाड्यातील खोल्यांमध्ये रात्रीच्या अंधारात कोणी येत जात असेल तरी कळणार नाही इतका इथे अंधार असतो. केवळ फुले जयंती - पुण्यतिथीला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला इथे हार अर्पण केला जातो. इतर दिवस मात्र कुणी ढुंकूनही भिडे वाड्याकडे लक्ष देत नसल्यानं आज मुलींची ही पहिली शाळा दारूचा 'अड्डा' बनला आहे! विशेष म्हणजे एरवी भिडे वाड्याबाबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर मत मांडणारे 'फुले' अभ्यासकही या विषयावर 'नॉट रिचेबल' होते.
"सगळी व्यसनं भिडे वाड्यात होतात हे धक्कादायक आहे. जिथून महिलांची पहिली शाळा सुरू झाली त्या स्मृतीस्थळी असा प्रकार होणं फार वेदनादायी आहे. ज्या वाड्यानं समाजाला क्रांती दिली, महिलांना शिक्षण दिलं तिथं आज कोणा दारुड्यांचा अड्डा झालाय... मी पुणे मनपा आणि पालकमंत्री अजित पवार यांना 'लोकमत' ने जी माहिती मिळवलीय त्याचं निवेदन देऊन पुढे काय करता येईल याचा पाठपुरावा करेन."- रुपाली ठोंबरे पाटील, रा. काँ. नेत्या