लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी सह परिसरातील चार गावांमध्ये शिरूर पोलिसांनी छापा टाकुन सुमारे पाच लाख रुपये किमतीची देशी, विदेशी व गावठी दारुचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अर्जुन सदाशिव हिल्लाळ, सागर गुडगुल,शुभम मुंजाळ (सर्व रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे), उमेश चंदू गायकवाड (रा. फाकटे, ता. शिरूर) संदीप घोडे (टाकळी हाजी) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण
खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बिरुदेव काबुगडे, कांबळे, पोसई विक्रम जाधव, पोसई स्नेहल चरापले, सहायक फौजदार नजिम पठाण, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार आण्णासाहेब कोळेकर, पोलीस अंमलदार करणसिंग जारवाल, पोलीस अंमलदार विशाल पालवे, पोलीस अंमलदार सुरेश नागलोत यांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी, फाकटे, मुंजाळवाडी, कवठे यमाई परिसरात अवैध गावठी दारू बनवणाऱ्या दारूभट्ट्यांवर व देशी-विदेशी दारू विकणारे यांच्यावर कारवाई करत ४ लाख ८८ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी (दि १५) टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे हद्दीमध्ये अवैधरीत्या देशी विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टीची विक्री चालू आहे, अशी बातमी मिळाली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ टाकळी हाजी, फाकटे, मुंजाळवाडी व कवठे यमाई येथे छापा टाकून एकूण ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ४३ प्लॅस्टिकचे बॅरल, प्रत्येकी २०० लिटर मापाचे व त्यामध्ये एकूण ८,६०० लि. गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, दोन लोखंडी बॅरल व इतर साहित्य तसेच देशी विदेशी दारूच्या एकूण ११५ बाटल्या असा एकूण ४ लाख ८८ हजार ५३४ रू. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केले.
फोटो : पोलिसांनी कवठे येमाई येथे उद्ध्वस्त केलेली अवैध दारूभट्टी.