भानुदास पऱ्हाड
आळंदी : रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यापार्श्वभूमीवर मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, मुक्ताई संस्थान, कोथळी आणि श्री क्षेत्र मेहुन या तीन ठिकाणांहून माऊलींना राखी पाठविण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीत रविवारी पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर मुक्ताईने पाठविलेली राखी माऊलींच्या समाधीवर अर्पण करण्यात आली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता आला नाही. मात्र मंदिर देवस्थानने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा सण भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
दरम्यान दरवर्षी रक्षाबंधनच्या पवित्र दिनी मुक्ताई संस्थानकडून माऊलींना राखी पाठवली जाते. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत जोपासली जात आहे. एरवी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मुक्ताईकडून आलेली राखी माऊलींना अर्पण केली जाते. मात्र मंदिर बंदच्या पार्श्वभूमीवर मोजक्या ब्रह्मवृंदांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे.