पुणे : हिरव्यागार घनदाट जंगलाचे स्वप्न आम्ही पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झगडा केला...हे बोल आहेत वनसंपदेला वाचविण्यासाठी संघर्ष केलेल्या ‘फॉरेस्ट वुमन’ उषा मेढावी यांचे. ‘लोकमत वृत्तसमूहा’तर्फे उषा मेढावी यांना शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकमत विमेन समिट’मध्ये वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वत:च्या अपंगत्वावर मात करताना इतरही अपंग मुलींमध्ये जिद्दीचे बळ निर्माण करणाºया मीनाक्षी देशपांडे यांना सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातील उषा मेढावी यांनी जंगल वाचविण्यासाठी महिलांना संघटित केले. देशपांडे यांनी निवासी प्रकल्पाच्या माध्यमातून अपंग मुलींना रोजगार मिळवून दिला. त्याचबरोबर त्यांच्यातील क्षमतांचे विकसनकरून क्रीडाक्षेत्रातही भरीव कामगिरीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. संघर्षाच्या टप्प्यांवरही मात करत पुढे जायचे याच कार्यसिद्धीच्या भावनेतून त्या दोघीही जीवनाला भिडल्या आणि त्यांचे कार्य हेच त्यांचे अंतिम ध्येय बनले.उषा मेढावी यांनी आपल्या कार्याचे सार मांडले. मोठा संघर्ष उभारत त्यांनी सुमारे ७०० एकरांचे जंगल वाचवले आहे. जंगल तस्करी रोखण्यासाठी, तस्करांना अडवण्यासाठी महिलांना एकत्र केले. ‘आपल्यापैकी एखादीचे बरे-वाईट झाले तरी चालेल; मात्र जंगल वाचले पाहिजे,’ असे सांगत उषातार्इंनी ‘लोकमत’शी बोलताना कार्याप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली.>मीनाक्षी देशपांडे यांनी ‘कोणी अवतीभवती माझ्या, जमले किंवा जमविलेया, पुरवायाते त्यांच्या गरजा, दे सामर्थ्य निदान, प्रभू नको दुसरे वरदान’ या कवितेतूनच कार्याची संपूर्ण प्रेरणा अधोरेखित केली. लहानपणी पोलिओ झाल्याने अपंगत्वाचा सामना करावा लागला; पण सुसंस्कृत आईवडील लाभल्याने पन्नास वर्षांपूर्वी मला पदवीधर व्हायची संधी मिळाली. गुणवत्ता असली, तरी अपंगत्वामुळे नोक रीवर कुणी घेत नव्हते. कमरेच्या खाली अवसान नसल्याने व्हिलचेअरवर ठेवावे लागते, इतका भयानक पोलिओ झाला; पण एका बँकेत नोकरी मिळाली. ही मुलगी अपंग असून कशी काम करते हे पाहण्यासाठी लोक यायचे. संधी मिळत गेल्या. लोकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातून हॅँडीकॅप असोसिएशन उभी राहिली. स्वत:ला क्रीडाक्षेत्राची आवड होती, त्यातून विद्यार्थी घडविले. तीन विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. मनात जिद्द असेल, तर काहीही करता येणे शक्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘फॉरेस्ट वुमन’च्या झगड्याचा ‘लोकमत विमेन समिट’मध्ये सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 1:06 AM