सासवड : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली असून पुण्यातील एमआयटी काॅलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली. या भीषण अपघातात गौरव जितेंद्र ललवाणी, रा. रायपूर, (छत्तीसगड) आणि रजत मोहता, कलकत्ता (पश्चिम बंगाल) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
साकेत ढागा, रोहित कुमार, वसुंधरा रस्तोगी, पूर्वी सिंग, ओमिया सिंग (हे पाच जण विविध प्रांतातील असून पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) सर्वांना जखमी अवस्थेत अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अपघातातील सर्व विद्यार्थी देशाच्या विविध भागांतील असून पुणे येथे एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यामधील मयत दोघे बी कॉममध्ये असून इतर विविध पदवीचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुरंदर तालुक्यातील बोपगावमधील कानिफनाथ मंदिरापासून सूर्योदय पाहायचा असल्याने एक्सयूव्ही ३०० ही गाडी भाड्याने घेऊन सोमवार, दि. ३ रोजी पहाटे पुणे कापूरहोळमार्गे नारायणपूरवरून सासवडच्या दिशेने येत होते. पहाटे चारच्या दरम्यान नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून हॉटेल मेघमल्हार आणि शिवलक्ष्मी व्हरायटीज या दुकानावर जाऊन आदळली.
भल्या पहाटे जोरदार आवाज झाल्याने श्रीदत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर, भानुदास बोरकर, सचिन झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य पाहून लगेचच परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. तसेच पोलिसांना फोन करून जखमींना पुणे येथे पाठवून दिले. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तर आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक मुन्ना शिंदे यांनी मृतदेह त्यांच्या राज्यात नेण्यासाठी सर्व व्यवस्था केली. सासवड पोलीस स्टेशनचे वतीने पुढील तपास सुरू आहे.