स्टंटबाजीतून दहशतीचे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:34 AM2019-03-31T00:34:16+5:302019-03-31T00:34:48+5:30
कामशेत परिसर : दुचाकी गाड्यांमधून येताहेत फटाक्यासारखे आवाज
कामशेत : शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठमोठे फटाके वाजत आहेत. हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट बदल करून फटाक्याच्या स्फोटसारखा आवाज काढला जात आहे. काही खोडसाळ व टवाळखोर तरुण हे प्रकार करीत आहेत.
त्याचा रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालक, पादचारी, रुग्ण व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. काही युवक पाच ते सहा दुचाक्यांवरून मुख्य रस्त्यावर स्टंटबाजी, आरडाओरडा करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शहरात सध्या बुलेट व इतर स्पोर्ट्स बाईकची क्रेझ असून, तरुण पिढीतील काही उनाड व टवाळखोर मुलांकडून या वाहनांचा वेगळ्याच कारणासाठी उपयोग होत आहे. शहरात काही वर्षांपासून बुलेट व इतर मॉडिफाइड स्पोर्टस बाईकच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट बदल करून मिसफायरिंगच्या नावाखाली मोठ्या फटाक्यांच्या स्फोटाचे कानठळ्या बसणारे आवाज काढले जात असून, वाहतूक पोलिसांचे त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. या उनाड मुलांच्या दुचाकीमधून निघणाऱ्या कानठळ्या बसवणाºया आवाजाने रुग्ण त्रस्त होत आहेत. कामशेत शहर मध्यवर्ती शहर असल्याने येथे नेहमीच मोठी वर्दळ असते.
भरधाव गाड्या : नागरिकांमध्ये भीती
दुचाकीवर वेगवेगळे स्टंट करणे, वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकी भरधाव चालवणे, पादचाऱ्यांना विशेषत: मुली-महिलांना कट मारणे आदीसह परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकाच वेळी पाच ते सहा अथवा त्यापेक्षा जास्त दुचाकी एकत्रित चालवून मोठा गोंगाट करणे आदी प्रकारांमुळे नागरिक हैराण आहेत. रस्त्यावरून जाणारे इतर वाहनचालक दचकत आहेत, तर पादचाºयांना रस्त्यावरून चालणे अवघड होत आहे. शहरातील विद्यालय, शाळा, खासगी शिकवण्या भरण्या-सुटण्याच्या वेळेत या टवाळखोर मुलांना जास्तच चेव चढत असल्याचे बोलले जात आहे. दुचाकीच्या फायरिंगमधून मोठ्याने आवाज काढून वाहन वेगात चालवणाºया या उनाड मुलांवर कारवाई कधी होणार, अशी सर्व स्तरांवरून विचारणा होत आहे.