बिबट्याच्या हल्ल्यात घोडी मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:14+5:302021-07-15T04:08:14+5:30
पडिक जमीन शेतकऱ्यांनी शेतीसाठी उघडल्या असून, दिवसेंदिवस उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बिबट्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ...
पडिक जमीन शेतकऱ्यांनी शेतीसाठी उघडल्या असून, दिवसेंदिवस उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बिबट्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. होरेवस्ती, खेसेवस्ती, डुंबरेवस्ती या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. मागील वर्षी धनगरांच्या मेंढ्यांवर हल्ला करून चार मेंढ्या ौमृत्युमुखी पडल्या होत्या. तसेच गेल्या महिन्यात संतोष डुले या मेढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून एक मेढी फस्त करून दोन मेंढ्या जखमी केल्या होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वी होरे वस्ती येथे गोटीराम नाथा कोळेकर या मेंढपाळाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात घोडी जागीच मृत्युमुखी पडली.
गेल्या काही महिन्यांत बिबट्याचे हल्ले पाळीव प्राण्यांवर होत असून, अनेक पाळीव प्राणी या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर व उपद्रव दिसत येथे दिसत आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, या ठिकाणी पिंजरा लाववा, अशी मागणी वन विभागाला ग्रामपंचायत तसेच शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, वनविभाग याकडे दुर्लक्ष करून उलट ग्रामस्थांनाच विचारत आहे. या ठिकाणी खरंच बिबट्या आहे का? असेल तर त्याचे फोटो पाठवा, पायाच्या ठशाचे फोटो दाखवा, मगच आम्ही पिंजरा लावू, अशी उत्तरे मिळत असल्याचे दावडीचे उपसरपंच राहुल कदम, माजी सरपंच हिरामण खेसे, राणीताई डुंबरे, संतोष सातपुते व ग्रामस्थांनी सांगितले.
-------------
दावडी परिसरात बिबट्याचे हल्ले पाळीव प्राण्यांवर होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाला या ठिकाणी पिंजरा लाववा, असे वारंवार लेखी पत्रव्यवहार व सांगूनही वनखाते दुर्लक्ष करीत आहे. उलट वनखाते सांगते बिबट्याचे फोटो काढा. म्हणजे जीव धोक्यात घालून बिबट्याचे फोटो काढायचे का?
-संभाजी घारे, सरपंच, दावडी, ता. खेड
----
दावडी परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात वनकर्मचारी जाऊन आले आहेत. आमचे वरिष्ठ येणार असल्याने दोन दिवस कामात बिझी आहे. दोन दिवसांनी याठिकाणी पिंजरा लावणार आहे.
-दत्तात्रय फाफाळे, वनपाल, राजगुरुनगर विभाग
दावडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली घोडी.