पुणे : मोटारीतून आलेल्या चार चोरट्यांनी रखवालदाराला धमकावून एका इमारतीतील ६ ठिकाणी घरफोड्या करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे पाषाण येथे घडला़ परंतु, त्यातील घरांमध्ये काहीही सामान नसल्याचे केवळ १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला़ ही घटना बाणेर पाषाण लिंक रोडवरील मॉन्टेव्हर्ट फिनेस सोसायटीत मंगळवारी पहाटे सव्वादोन ते सव्वातीनदरम्यान घडली़
याप्रकरणी तन्मय रामदास बंडोपाध्याय (वय ४५, रा़ मॉन्टेव्हर्ट फिनेस सोसायटी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की या सोसायटीत सुमितकुमार शर्मा हे रखवालदार रात्री रखवाली करीत असताना मोटारीतून चार जण आले़ त्यांनी शर्मा यांना पार्किंगमध्ये नेऊन जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांना गप्प बसण्यास सांगितले़ त्यानंतर चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील तुषार बंडोपाध्याय यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडला व चोरी करण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यात त्यांना काहीही मिळाले नाही़ त्यानंतर त्यांनी चौथ्या मजल्यावरील हरेष आम्रे यांचा फ्लॅट फोडून तेथील १५ हजार रुपयांची रोकड तसेच पाचव्या मजल्यावरील एल. व्ही़ श्रीधर यांच्या फ्लॅटमधील सोन्याचांदीचे दागिने चोरले़ तिसऱ्या मजल्यावरील शास्त्री व अशोक चौधरी व सी बिल्डिंगमधील सुमन लता सिंग यांच्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला़ हे फ्लॅट रिकामे असल्याने त्यातील काहीही चोरीला गेले नाही़
या घटनेची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, एस़ आऱ ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक पी़ आऱ वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़ सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे मोटारीतून आलेले दिसत असून अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत़