........................................
होळकरवाडीतील विरोधाभास; गावाच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी
.....................................
दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : होळकरवाडीत घरोघरी स्वच्छतागृह असल्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले असले, तरी गावात आणि परिसरात जमा होणारे सांडपाणी हे गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पुलाखाली उघड्यावर सोडून देण्यात आल्याने मोठा विरोधाभास दिसून येतो. दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. अन्य गावांच्या तुलनेत, गावात फार जास्त प्रमाणात नागरिकरण झाले नसल्याने अतिक्रमणांची संख्या वाढलेली नाही. रस्त्यांलगतही आजूबाजूला सुटसुटीत जागा असल्याने वाहतूककोंडीची समस्याही जाणवत नाही.
गावात पिण्याच्या पाण्यासाठी धनगर तलाव, काळूबाई तलाव आणि पिंझलवस्ती तलावातून सोय करण्यात आली आहे. परंतु तरीही ते पाणी पुरेसे नसल्याची तक्रार गावकरी करतात. यावर्षी भूजल पातळी खाली गेल्याने आता सध्या टँकर सुरू आहेत. सोसायट्यांचे प्रमाण अजून कमी आहे. सोसायट्या वाढतील तेव्हा आम्ही पाण्याचे नियोजन कसे करणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला. जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनीमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून पाईपलाईनसाठी प्रयत्न सुरू आहेत असेही गावकऱ्यांनी सांगितले.
गाव हागणदारीमुक्त असल्याने प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत गावाने विशेष काळजी घेतल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
तरुणांना कुस्तीसाठी तालमीची सुविधा आहे परंतु व्यायामशाळा नसल्याने, पालिकेने व्यायामशाळा मंजूर करून द्यावी, अशी मागणी गावातील तरुणांनी ʻलोकमतʼजवळ बोलताना केली.
गावातील मोठी लोकसंख्या ही शेतीक्षेत्राशी संबंधित असल्याने शेतकऱ्यांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती आहे. आमच्या जमिनीवर आरक्षण पडले तर आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, याची चिंता गावकऱ्यांना आहे. महापालिकेने गाव विलीन करताना टाउनप्लॅनिंग स्कीमबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.
____________________________________
गावातील कचरा व सांडपाण्याच्या निवारणाची सोय उत्तम आहे, पण त्यासाठी मल्लनिस्सारण प्रकल्प व कचरा व्यवस्थापन प्रकल्प महापालिकेने मंजूर करावेत.
-एस. व्ही. काशीद
____________________________________
याआधी ११ गावे आणि आमच्या बाजूला असणाऱ्या उरुळी देवाची गावाचा समावेश पालिकेत झाला होता, आज त्यांच्या समस्या सुटल्या आहेत का, तेथेच विकास नाही तर आमच्या गावाचा समावेश करून काहीही साध्य होणार नाही.
-वामन जमादार,
ज्येष्ठ नागरिक
...................
फोटो ओळ
होळकरवाडीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम पीएमआरडीमार्फत चांगल्या पद्धतीने करण्यात आल्याने दळणवळणाची मोठी समस्या सुटली आहे.