Video: महाराष्ट्राचे ‘कोरोना योद्धे’ कसे लढले? कर्तव्यासोबत माणुसकीची कथा सांगणारा माहितीपट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:46 PM2020-08-09T13:46:50+5:302020-08-09T14:09:10+5:30
पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांची मुलाखत.
- विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात पोलीस नेहमीच धावून जातात. पण लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी, उपासमार याबरोबरच बंदोबस्त अशा तीन आघाड्यांवर तेही इतका दीर्घकाळ लढण्याची वेळ महाराष्ट्रपोलिसांवर प्रथमच आली. यात अनेक पोलीस बांधव शहीद झाले. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. हे काम कायमस्वरुपी जतन व्हावे, या हेतूने महाराष्ट्र पोलीस कोरोना योद्धा हा माहितीपट बनविल्याचे पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांनी सांगितले. महाराष्ट्र गुप्तचर अॅकेडमीमध्ये असलेल्या सरतापे यांच्याशी साधलेला संवाद.
अशी फिल्म तयार करावी, असे नेमके आपल्याला का वाटले?
पुणे पोलीस दलातील वाहतूक शाखेत असताना ‘गिव्ह वे टु अॅम्बुलन्स’ अॅम्बुलन्सला रस्ता द्या, हा छोटासा अडीच मिनिटाचा व्हिडिओ बनविला होता. तो फेसबुकमार्फत तब्बल साडेचार कोटी लोकांनी पाहिला, इतरांना शेअर केला. त्यानंतर ‘यमराज पुण्यात’, अपघातग्रस्तांना मदत करावी, यासाठी ‘हेल्पिंग हँड’ या शॉर्ट फिल्म बनविल्या. त्या चांगल्याच नावाजल्या गेल्या. राज्यातील सर्व पोलीस दलाने या काळात चांगले काम केले. मात्र, काळाबरोबर ते पुसले जाऊ नये. राज्यभरातील पोलिसांच्या कामगिरी एकत्रितपणे दिसावी यासाठी हा प्रयत्न केला.
त्यासाठी काय करावे लागले?
संपूर्ण राज्यातील पोलीस दलातून त्यांनी केलेले व्हिडिओ मागविले. साधारण ५० तासांचे हे व्हिडिओ, फोटो आमच्याकडे आले होते. त्यात पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करुन एक संहिता तयार केली. त्यातून सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पोलिसांचे कौतुक तर आहेच, आजवर पोलिसांना एकाचवेळी इतकी कामे तीही माणुसकीच्या नात्याने करण्याची वेळ आली नव्हती. तो माणुसकीचा ओलावा जपण्याचा प्रयत्न आम्ही या माहितीपटात केला आहे.
पोलिसांनी कायदा राबविता विनाकारण फिरणाऱ्यांना जशी शिक्षा दिली. तसेच गरजू, अडलेल्या, उपासमार सहन करत असलेल्या लोकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन मदत केली. पोलिसांची विविध रुपे या माहितीपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या माहितीपटासाठी संपूर्ण राज्यभरातील पोलीस, वृत्तपत्र व त्यांच्या वेबसाईट, वृत्तवाहिन्या यांची मदत झाली. माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन, निवेदन मी केले असले तरी मला कॅमेरामन नागेश नित्रुडकर, सहायक दिग्दर्शन अक्षय, संकलन शोएब शेख, साऊंड केदार आठवले, एके स्टुडिओ, बिंक स्टुडिओ, सागर वंजारी या सर्वांनी कोणताही मोबदला न घेता हे काम केले. त्यामुळेच ३० मिनिटांचा हा माहितीपट आज तयार होऊ शकला.
या माहितीपटाद्वारे पोलिसांचे काम सर्वसामान्यांबरोबरच जगभरातील लोकांपर्यंत पोहचविण्याचा हा एक प्रयत्न आहे. तो युट्युबवर उपलब्ध आहे.-