SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता अजूनही विद्यापीठात कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:01 AM2022-05-23T08:01:27+5:302022-05-23T08:02:49+5:30
अधिष्ठाता अजूनही विद्यापीठात कसे? अशी चर्चा शिक्षणवर्तुळात रंगली...
पुणे : विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यकालाबरोबर विद्यापीठाच्या चारही अधिष्ठात्यांचा कार्यकाल संपुष्टात आला. मात्र, अजूनही सर्व अधिष्ठाता आपल्या कार्यालयात येऊन नियमितपणे काम करत आहेत. त्यामुळे अधिष्ठाता अजूनही विद्यापीठात कसे? अशी चर्चा शिक्षणवर्तुळात रंगली आहे.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरू यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता यांचा कार्यकाल कुलगुरूंच्या बरोबरच संपुष्टात येतो. विद्यापीठ प्रशासनानेसुद्धा डॉ. नितीन करमळकर यांच्या निवृत्तीपूर्वी तीन दिवस आधी सर्व अधिष्ठाता यांना आपला कार्यकाल कुलगुरू यांच्याबरोबर संपुष्टात येणार असल्याचे पत्रही दिले होते. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दुसऱ्याच दिवशी आपला पदभार सोडून गरवारे महाविद्यालयात प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतली. परंतु, कायद्यातील इतर तरतुदींचा आधार घेऊन सर्व अधिष्ठाता अजूनही शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत आपण कार्यरत राहू शकतो, नव्या कुलगुरूंकडून पुन्हा नियुक्ती मिळू शकते, या बाबी गृहीत धरून विद्यापीठात येत आहेत.
प्र-कुलगुरूप्रमाणे सर्व अधिष्ठाता यांनी आपल्या पूर्वपदावर कार्यरत होणे अपेक्षित आहे. कार्यकाल संपुष्टात आलेला असताना अधिष्ठाता दररोज नियमितपणे कामकाज करत असले तरी शासनाकडून त्यांना या कामाचे वेतन दिले जाणार आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रभारी कुलगुरू निर्णय केंव्हा घेणार?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी कायदेशीर बाबी तपासून अधिष्ठाता यांच्या नियुक्त यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, या घटनेस पाच दिवस उलटून गेले. तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही. तसेच यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.