पुणे : शहरातील नक्की किती कुत्र्यांवर संस्थांनी नसबंदी केली. याबाबत वस्तुनिष्ठ माहिती यासाठी विकसित केलेल्या अॅपच्या माध्यमातून महापालिकेला देण्याची मागणी हे काम करणाºया संस्थांकडे केली आहे. तसेच अॅपनुसार ही माहिती दिल्यानंतरच संबंधित संस्थांना बिलाची रक्कम आदा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणार कचरा व या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु या भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. भटकी कुत्रे चावण्याचे प्रकार देखील वाढत आहे. यामुळेच शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमितपणे या कुत्र्यांची नसबंदी व अॅटिरेबीज लसीकरण देखील करण्यात येते. यासाठी महापालिकेच्या वतीने ब्ल्यू क्रॉस सोसायटी व अॅनिमलस वेलफेअर असोसिएशनच्या या दोन खाजगी संस्थांना हे काम दिले आहे. यासाठी संबंधित संस्थांना एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल १ हजार ४०० रुपये देण्यात येता. या संस्थांकडून महिन्याला सरासरी दीड ते दोन हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचा दावा संस्थांनी केला आहे. त्या संदर्भातील सर्व आकडेवारी महापालिकेला सादर करण्यात येते. त्यानंतर दर महिन्याला महापालिकेकडून संस्थेला ससासरी २० लाख रुपये देण्यात येतात. महापालिकेच्या वतीने हे काम खाजगी संस्थांना देताना दररोज किती भटकी कुत्रे पकडली, कोणत्या भागातून, किती वाजता, किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली व शस्त्रक्रिया केल्यानंतर या कुत्र्यांना पुन्हा कुठे सोडले, यासाठी संबंधित कुत्र्याचे छायाचित्र काढून त्याची सविस्तर माहिती अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दररोज कळविणे बंधनकारक आहे. हे अॅप विकसित करण्यासाठी महापालिकेकडून संस्थांना तब्बल ४ लाख ७० हजार रुपयांचा निधी देखील देणार आहे. परंतु, अद्यापही यासाठी आवश्यक अॅपच पूर्णपणे विकसित कले नाही. या अॅपचा अॅक्सेस महापालिकेला दिलेला नाही. यामुळे संस्थांकडून लेखी स्वरुपात देण्यात येणाºया आकडेवारीच्या आधारेच सध्या दर महिन्याला लाखो रुपयांची बिले काढली जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने अॅप विकसित करून त्याची सविस्तर माहिती महापालिकेला दिल्यानंतरच संस्थांना आतापर्यंत केलेल्या कामाची बिले आदा करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले असल्याची माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली.
शहरामध्ये एकूण भटक्या कुत्र्यांची संख्या (अंदाजे) : सुमारे ४ लाख आतापर्यंत नसबंदी करण्यात आलेल्या कुत्र्यांची संख्या : ८६ हजार महिन्याला सरासरी नसबंदी करण्यात येणाऱ्या कुत्र्यांची संख्या : दीड ते दोन हजार नसबंदीसाठी संस्थांना देण्यात येणारा निधी : महिन्याला २० लाख सरासरी एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी खर्च : १४०० रुपये