उत्पन्नवाढीसाठी रेल्वेचा ‘शून्य’चा खेळ,
गाड्यांना विशेष दर्जा देऊन सवलती रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासनाने पुण्यासह देशातील विविध स्थानकांवरून प्रवासी रेल्वे सुरू केल्या. पण हे करताना यंदाही रेल्वेने चलाखी केली आहे. गाड्यांच्या सुरुवातीला ‘शून्य’ क्रमांक देऊन त्यांनी गाड्यांना विशेष रेल्वेचा दर्जा दिला. त्यामुळे प्रवाशांच्या सवलती रद्द झाल्या, तर दुसरीकडे फेस्टिवल ट्रेन म्हणून सुरू असलेल्या गाड्यांना जवळपास दुप्पट तिकीट दर आकारण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या रेल्वे प्रशासनाने पुन्हा सुरू केल्या. मात्र त्या करताना रेल्वेने पुन्हा चलाखी केली.
या गाड्यांना विशेषचा दर्जा :
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्या या विशेष दर्जाच्या आहेत. यात पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी, पुणे-सोलापूर हुतात्मा, पुणे-जम्मू तावी झेलम, पुणे-दानापूर, पुणे-हावडा आदी गाड्या विशेष दर्जाच्या गाड्या म्हणून धावत आहेत.
तिकिटात फरक किती?
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या
यशवंतपूर-जयपूर, बंगळुरू-अजमेर, जोधपूर-बंगळुरू, गांधीधाम-बेंगळुरू, अजमेर-म्हैसूर, मुंबई-नागरकोईल, कुर्ला-चेन्नई एक्स्प्रेस आदी गाड्यांना फेस्टिवल गाड्यांचा दर्जा दिला. त्यामुळे त्याचे तिकीटदर जवळपास १०० ते ११० रुपयांनी वाढले आहे. या गाड्यांनादेखील विशेषचा दर्जा दिल्याने याला तिकीट दरात असलेल्या सर्व सवलती पुन्हा रद्द झाल्या आहेत.
जवळपास ५३ प्रकारच्या सवलती /
रेल्वे प्रशासन सामान्य प्रवाशांना रेल्वे तिकीट दरात जवळपास ५३ प्रकारच्या सवलती देते. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांकरीता अर्धे तिकीट, अधिस्वीकृती धारक पत्रकार, दिव्यांग, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती, अंध व्यक्ती, भारत सरकारे दिलेले पुरस्कारप्राप्त व्यक्ती आदी घटकांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासात २५ ते ७५ टक्के तर काही घटकांना १०० टक्के सवलत दिली जाते. या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांना पूर्ण दराने तिकीट काढावे लागते.
रेल्वे प्रशासनाने आता विशेष दर्जाच्या रेल्वे बंद करून पूर्वीसारख्या सामान्य दर्जाचे रेल्वे सुरू करायला हवी. यातून रेल्वेचा जरी फायदा होत असला तरीही सामान्य प्रवासी मात्र विनाकारण भरडला जात आहे. रेल्वेने आता फायद्याचा विचार न करता प्रवाशांचा विचार करावा. तसेच जनरल तिकिटाची विक्री सुरू करून जनरल तिकीट वरून प्रवास करण्यास मुभा दिली पाहिजे.
हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे