गरळ ओकणाऱ्यांना ‘गुरूजी‘ म्हणायचे तरी कसे ? : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:01 PM2018-07-28T15:01:44+5:302018-07-28T15:16:39+5:30
देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. त्याच भिडे आडनावाशी साम्य असलेली एक व्यक्ती सध्या महिलांना पुन्हा चूल व मूल या क्षेत्रात परत ढकलू पाहत आहे.
पुणे: माझ्या झाडाचे आंबे खा, मुले होतील. मनू संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अशी गरळ ओकणाऱ्यांना ‘गुरूजी’तरी कसे म्हणायचे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अशा मनुवाद्यांचा प्रतिकार एकजूटीने करायला हवा असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे व चिंतामणी ज्ञानपीठच्या यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदीरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार, शास्त्रीय नृत्य गुरु सुचेता भिडे - चापेकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला सांकला यांचा पवार यांच्या हस्ते शनिवारी सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महिला आघाडी अध्यक्ष रुपाली चाकणकर, भाऊसाहेब भोईर, भगवान साळुंके, राकेश कामठे, मनाली भिलारे, रवींद्र माळवदकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशातील मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली. त्याच भिडे आडनावाशी साम्य सांगणारी एक व्यक्ती सध्या महिलांना पुन्हा चूल व मूल या क्षेत्रात परत पाठवायला पाहते आहे. फुले दांपत्यांला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती आजही अशा मधूनच डोके वर काढत असतात. त्यांचा प्रतिकार एकजूटीने करायला हवा. महिला व पुरूषांमध्ये भेद केला जातो ते देश मागासलेलेच राहतात. भारतात त्यांना सन्मान दिला जातो हे काहींनी पाहवत नाही व ते असे काहीतरी बरळत असतात. किमान सत्तारूढ झाल्यावर जातीभेद, धर्मभेद सोडला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी भिडे गुरुजींचे समर्थन करणाऱ्या भाजप - शिवसेनेला काढला.
कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजकार्य आणि आपल्या कलेचा प्रसार करणाऱ्या विद्या बाळ, कीर्ती शिलेदार, सुचेता भिडे - चापेकर, प्रमिला सांकला यांच्यासारख्यांच्या मागे उभे राहण्याची आज गरज आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. अप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, अभय मांढरे, हर्षवर्धन मानकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. गुरूजन गौरव पुरस्काराचे हे सलग १३ वे वर्ष होते. रेणुसे यांनी स्वागत व गौरवार्थी गुरुजनांचा परिचय करून दिला. विशाल तांबे यांनी आभार मानले.
.................
फडणवीसांचे विधान तपासायला हवे
विठ्ठल मंदिरात पुजेला गेलो नाही कारण आंदोलनकर्त्यांनी गर्दीत साप सोडण्याचा इशारा दिला होता, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असावे असे मला मुळीच वाटत नाही. मात्र, ते सोशल मिडियावरून व्हायरल झाले. आपण या माध्यमांचा नको इतका व नको तसा वापर करत आहोत असे पवार म्हणाले. आता आपण तसे बोललो की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे तरी किंवा त्यांनी हे संभाषण ज्यांच्यासमोर केले, त्यांनी पुढे यावे व यातील खरेखोटेपणा उघड करावा असे आवाहन पवार यांनी केले.