पुणे - कुराणमध्ये ‘तिहेरी तलाक’ चा उल्लेख नाही. केवळ ‘तलाक’ हा शब्द देण्यात आला आहे. त्यामध्ये तलाक देण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. पाकिस्तानात तोंडी तलाक देणाऱ्याला फटक्यांची शिक्षा दिली जाते. भारतात मात्र तलाक कधीही, केव्हाही, कुठेही दिला जातो. इस्लाम धर्मात दारू पिणे हे निषिद्ध मानले गेले आहे. तरीही दारू पिऊन पत्नीला ‘तिहेरी तलाक’ कसा काय उच्चारला जातो? हे अँटी इस्लामिक आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक, अभ्यासक आणि समतावादी कार्यकत्यां डॉ. झीनत शौकत अली यांनी मुस्लिम कायद्यातील ‘तिहेरी तलाक’ प्रथेचा बुरखा फाडला.हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४९व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. झीनत शौकत अली यांना ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान’ ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले राष्ट्रीय एकात्मकता पुरस्कार दिल्लीच्या धनक फॉर ह्यूमॅनिटी संस्थेला देण्यात आला, तर शाहीर बशीर मोमीन यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुस्लिम सत्यशोधक त्रैमासिक पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.मुस्लिम धर्मामधील महिलांच्या स्थितीविषयी त्या म्हणाल्या, मुस्लिम महिलांची स्थिती फारशी चांगली नाही तर अत्यंत दु:खदायक आहे. शिक्षण आर्थिक क्षेत्रात महिलांची अधोगती आहे. मुस्लिम महिलांचे प्राथमिक शिक्षणात १५.२ टक्के प्रमाण आहे पण माध्यमिकमध्ये हेच प्रमाण घटत आहे. पदवीपर्यंत २ टक्के महिला पोहोचतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. इस्लाम धर्मामध्ये सर्वांनी ज्ञान आत्मसात करावे असे नमूद करण्यात आले आहे. मात्र तरीही मुस्लिमांमध्ये शिक्षणाची परिस्थिती चांगली नाही. अत्यंत मागासलेली स्थिती आहे.डॉ. बाबा आढाव यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी केले. कार्यक्रमापूर्वी अभिनेत्री ज्योती सुभाष दिग्दर्शित ‘हमीद : द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले.विधेयकाला पाठिंबा द्यायला हवाडॉ. झीनत शौकत अली यांनी, सर्वोच्च न्यायालयाने ‘तिहेरी तलाक’ वर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आणि भाजपा सरकार संसदेत यासंबंधीचे विधेयक आणणार आहे, हे विधेयक महिलांच्या बाजूने आहे. त्याला पाठिंबा द्यायला हवे असे सांगितले.अनेक अनैतिक गोष्टी इस्लामच्या नावावर खपवल्या जात आहेत. ’तिहेरी तलाक’ हा क्रिमिनलाईज करू नये असे सांगितले जात आहे, मात्र तो का क्रिमिनलाईज केला जाऊ नये? तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा धरला जायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दारू पिऊन ‘तिहेरी तलाक’ उच्चारणे कसे काय चालते? डॉ. झीनत शौकत अली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:02 AM