पुणे : कात्रज- गुजरवाडी रस्त्यावर रविवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत फर्निचरचे गोडाऊन जाळून खाक झाले. गोदामाला रविवारची सुट्टी असल्याने तेथे कोणीही नव्हते. गोदामही बंद असल्याने जीवित हानी टळली.
कात्रजहून पुढे घाटात जाणाऱ्या रस्त्यावरील भागात फर्निचरची दुकाने व गोडाऊन्स आहेत. तेथील ओम एंटरप्रायजेस या फर्निचरच्या गोडाऊनमधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानुसार या दलाचे कर्मचारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. आगीचे स्वरुप लक्षात घेऊन आणखी कुमक मागविण्यात आली. या दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. या दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. सुटीमुळे मालक सकाळीच कुलूप लावून गेले होते. कोणीही कामगार आता नव्हते. त्यामुळे जिवीतहानी टळली. मात्र, संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज भारती विद्यापीठ पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाना फाटे, अतुल गाडे, योगेश शेलार,शिवशंभू प्रतिष्ठानचे महेश कदम, सागर खंदारे, राहुल ढेबे, सलीम जमादार यांच्यासह स्थानिक मंडळींनी आग विझविण्यात मोठे सहाय्य केले.
आगीमुळे या संपूर्ण भागाता धूर पसरला होता. तसेच या भागातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता. आगीचे वृत्त समजल्यावर अनेकांनी मदतीसाठी तेथे धाव घेतली.