पुणे :खाकी वर्दीतील माणुसकी हरवत चालली आहे. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात अंतर पडत आहे, अशी विधाने कानावर येत असताना पुण्यात मात्र पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होताना दिसत आहे. सायकल हरवलेल्या वृद्धाची होणारी अडचण आणि गरज लक्षात घेऊन अखेर पोलीस कर्मचाऱ्यांचीच संबंधित व्यक्तीला नवी कोरी सायकल घेऊन दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या चारबावडी पोलीस चौकीत काळुराम मारुती शेरे या ८० वर्षांच्या आजोबांनी सायकल हरवल्याची तक्रार नोंदवली. शेरे हे गेली अनेक वर्ष शहरातील कार्यलयांमध्ये जेवणाचे डबे पोहोचवतात. अगदी ऊन, वारा, पाऊस असला तरी लोकांच्या जेवणाची आबाळ होऊ नये त्यांची धडपड असते. मात्र दोन दिवसांपूर्वी कॅम्प भागातून त्यांची सायकल चोरीला गेली. सायकल नसल्यामुळे आता डबे कसे पोचवायचे असा गहन प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यामुळे ते निराश झाले होते.
अखेर त्यांची ही समस्या लक्षात घेऊन चारबावडी पोलीस चौकीतील पोलीस नाईक इम्रान मुलाणी, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व फाउंडेशनचे सदस्य मन्सूर शेख यांनी स्वखर्चातून नवीन सायकल खरेदी केली. आणि ती लष्कर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक(गुन्हे) माया देवरे व उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांच्या हस्ते शेरे यांना सूपूर्द केली. जुनी नाही पण नवी सायकल मिळाल्याने त्यांचा चेहरा खुलला. आणि हसऱ्या चेहऱ्याने मनापासून पोलिसांचे आभार मानत त्यांनी नव्या सायकलला टांग मारल्याचे दृश्य उपस्थितांना बघायला मिळाले.