हाच खरा 'मावळा', अन् निवृत्त जवानाने गडावरील चिमुकलीला केली शिक्षणासाठी मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 05:00 PM2020-01-20T17:00:36+5:302020-01-20T17:03:13+5:30
श्रेया संतोष खरात ही पाली गावची राहणार मुलगी. तोरणा किल्ल्याच्या सीमेवर तिचे घर.
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याला भेट देणं म्हणजे एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळवणं, असंच काहीतरी म्हणावं लागेल. याच गड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार अन् संस्कारांची शिदोरीही मावळ्यांना भेटते. भारतीय सैन्यात 17 वर्षे नोकरी केलेल्या जवानाने एका चिमुकलीच्या वेदना पाहून महाराजांचा मावळा असल्याचं दाखवून दिलंय. रमेश खरमाळे असे या निवृत्त जवानाचे नाव आहे. रमेश यांनी गडकिल्ल्यांवर जगण्याचं ओझं वाहणाऱ्या चिमुकलीच्या डोक्यावरील भार कमी केलाय.
श्रेया संतोष खरात ही पाली गावची राहणार मुलगी. तोरणा किल्ल्याच्या सीमेवर तिचे घर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खूप लांबचा प्रवास. रविवारी आपल्या सुट्टीच्या दिवशी ही चिमुकली आपल्या डोक्यावर पाणी आणि सरबतांच्या बाटल्यांचं ओझं वाहत होती. गड किल्ल्यांवर अनेकजण पर्यटनासाठी येतात, पण आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ती दर रविवारी ही चढाई करते. दुसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या जीवाला हे ओझं वाहताना पाहून, शिवरायांचा मावळा मानणाऱ्या रमेश खरमाळे यांनी त्या चिमुकलीची आपुलकीने विचारपूस केली. त्यानंतर, तिच्याकडून सरबत घेऊन पिले व पाण्याच्या बाटल्याही विकत घेतल्या. विशेष म्हणजे हे सर्व झाल्यानंतर, खरमाळे यांनी त्या चिमुकलीच्या हातात तिच्या शिक्षणासाठी 1 वर्षाचा खर्च म्हणून रोख रक्कमही दिली. रक्कम घ्यावी की नाही, हेही न समजणाऱ्या चिमुकलीच्या डोक्यावरचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न शिवभक्त असलेल्या सैन्यातील निवृत्त जवानाने केला आहे. सध्या, सोशल मीडियावर त्यांचा चिमुकलीसोबतचा फोटो व्हायरल होत असून त्यांचे मोठे कौतुक करण्यात येत आहे. रमेश खरनाळे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रहिवासी आहेत.रमेश यांनी मराठा लाइट इन्फंट्री बटालियनमध्ये 17 वर्षे नोकरी केली आहे. सध्या ते सेवानिवृत्त आहेत.
रमेश खरनाळे यांची फेसबुक पोस्ट :
छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन चढत होती. थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजिवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातुन छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमूरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तीने आवाज दिला दादा सरबत,पाणी, ताक घ्या की... मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं बाळा कुठची राहणार. पाली गावच नाव सांगितलं. शाळेत जातेस का? २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले. खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतली. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला. गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला.
जय जिजाऊ जय शिवराय..