अभिजीत डुंगरवाल
कात्रज: गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत राहणाऱ्या राहुल जाधव यांची आई सुमारे २० दिवसांपूर्वी कामावर गेल्या आणि मात्र घरी परतल्याच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी खूप शोधाशोध केली.मात्र, त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्याचवेळी कात्रज भागातील राजस चौकात काही दिवसांपासून भोळसट स्वभावाची महिला वास्तव्य करत होती. पण दोन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये या महिलेला जेवण तर सोडाच पाणी देखील मिळाले नाही.परंतू, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे कात्रजमधील दोन युवकांनी तिच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली.या मदतीची लोकमतने दखल घेतली. आणि हीच गोष्ट या महिलेला पुन्हा आपले घर आणि कुटुंब परत मिळण्यासाठी पुरेशी ठरली.
सुशीला माने असे आपलं नाव सांगणारी ही वयोवृध्द महिला कात्रज येथील राजस चौकात अनेक दिवसापासून राहत होती. हॉटेलमध्ये येणारे लोक तिला खायला द्यायचे. मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे हॉटेल उघडले नाही किंवा तिला मदत करणारे नागरिक देखील दिसले नाहीत. कात्रज भागातील ऋषीकेश कामठे व तृनाल भरगुडे या दोन युवकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी तिची अन्न पाण्याची व्यवस्था केली.
या युवकांनी महिलेची चौकशी केली असता, मला गुलटेकडी येथून कचरा टाकणाऱ्या एका माणसाने या ठिकाणी आणून सोडले. मी कुलकर्णी नावाच्या एका बाईकडे बंगल्यात काम करत होते.माझे केस देखील या कचरा टाकणाऱ्या माणसाने कापल्याचे सांगतानाच मला परत गुलटेकडीला सोडण्याची विनंती केली. लॉकडाऊन उघडला की तुम्हाला तुम्ही जिथं राहत होता त्या ठिकाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी या वयोवृद्ध महिलेला दिले.
याचदरम्यान लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मुकुंदनगरमध्ये डॉ.राहुल शहा यांच्या दवाखान्यात कामाला असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या सुनंदा पठारे नावाच्या मुलीने वाचली. त्याक्षणी आपल्या भावाला म्हणजे राहुल जाधवला आपल्या आईबद्दल कळविले
लोकमतची बातमी वाचल्यावर राहुल जाधव यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन गाठले व त्यांना ती बातमी दाखवली. स्वारगेट पोलिसांनी त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी विक्रम सांवत यांना राहुल जाधव भेटले. विक्रम यांनी बातमी वाचून या महिलेला मदत करणारे ऋषीकेश कामठे व तृणाल भरगुडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी राहुल जाधव यांची चौकशी करून पोलिसांच्या समक्ष या महिलेला तिच्या मुलाच्या ताब्यात दिले. यावेळी राहुल जाधव यांनी लोकमत मुळे मला माझी आई मिळाली मी आपला आभारी आहे अशी प्रतिक्रिया दिली.