पर्यटनासाठी गेलेल्या पती - पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली; महिलेचा मृत्यू, दोघं बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 06:24 PM2021-08-15T18:24:52+5:302021-08-15T18:25:00+5:30
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली
खडकवासला : पानशेत धरणाच्या जवळ पर्यटनासाठी गेलेल्या परिवाराची अचानक टायर फुटल्याने पानशेत धरणात जाऊन पडली आहे. अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगा वाचले आहेत.
समृद्धी योगेश देशपांडे (वय ३३) या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती योगेश देशपांडे (वय ३५) आणि मुलगा (नाव महिती नाही, वय ९) हे यातून बचावले आहेत. ही दुर्घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-कुरण-वेल्हे या रस्त्यावरील कादवे या ठिकाणी ही घटना घडली. या कारमध्ये तिघे जणच प्रवास करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे कुटुंबातील हे तिघेजण पुण्याहूण पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. कुरण गावाच्या पुढे आल्यावर एका हॉटेलवर ते थांबले. त्यानंतर त्यांनी कार धरणाच्या बाजूला नेली. पाऊस असल्याने ते कारमध्ये बसले होते, कारमध्येच त्यांनी नाश्ता केला. त्यांनतर दुपारी दोन वाजता ते पुढे कादवे गावाच्या दिशेने निघाले. योगेश कार चालवत होते आणि त्यांच्या शेजारी मुलगा बसला होता. मागे पत्नी समृद्धी बसल्या होत्या. धरणाच्या पाण्याच्या बाजूने कार चाललेली असताना अचानक कारचा टायर फुटल्याने योगेश यांनी कारवरील नियंत्रण गमावलं आणि कार रस्ता सोडून पाण्यात जाऊन पडली. सुरुवातीला काही वेळ कार पाण्यात तरंगत होती. पण नंतर पाणी आतमध्ये शिरल्याने कार पाण्यात बुडाली. यावेळी पुढच्या बाजूच्या दो्नही खिडक्या उघड्या असल्याने योगेश आणि त्यांचा मुलगा हे दोघेही पाण्याबाहेर पडले. पण मागील दरवाजाची काच बंद असल्याने समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही.
मोठा आवाज झाल्याने शेजारील हॉटेलमधी सर्वजण इतर नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधील दोरी घेऊन त्यापैकी एकाने पाण्यात उडी मारली. त्याने गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि ती झाडाला बांधली, त्यामुळे कारने तळ गाठला नाही. त्यांनी पुढच्या खिडकीतून समृद्धी यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. त्यानंतर कारच्या जॅकनं मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने पानशेत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच समृद्धी यांचा मृत्यू झाला होता.