पुणे : पत्नीला सतत मारहाण करत शाररीक व मानसिक त्रास देत तिला माहेरी राहण्यास प्रवृत्त करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. माहेरुन पैसे आणण्याकरिता तिच्याकडे तगादा लावला जात असून तिने ते करण्यास विरोध केल्यास घटस्फोट दिला जात आहे. अशातच कौंटूंबिक न्यायालयाने मानसिक व शारीरिक छळ केल्याने माहेरी राहत असलेल्या पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणा-या दोन स्वतंत्र प्रकरणांत पतींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
आर्थिक परिस्थिती सुस्थितीत असताना पती पत्नीची जबाबदारी स्वीकारत नसल्याचे या निकालांत नमूद करण्यात आले आहे. पहिल्या प्रकरणात पत्नी अलका यांनी पती रमेश (नावे बदललेली) यांच्याकडून स्वत:च्या व आजारी मुलीच्या उदरनिर्वाह करण्यासाठी पोटगी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने 8 हजार 500 रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र रमेश यांनी पोटगी आणि दाव्याच्या खर्चाचे 500 हजार रुपये असे एकूण 98 हजार 500 रुपये अलका यांना दिले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. अलका यांच्या अर्जावरून रमेश यांना वॉरंट काढून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांची 11 महिन्यांसाठी तुरुंगात रवानगी केली.
दुस-या प्रकरणात पती राजू यांनी पत्नी रमा (नावे बदललेली) यांना 4 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र राजू यांनी 16 महिने पोटगी थकविली. तसेच तक्रार अर्जाचे 5 हजार रुपये दिले नाही म्हणून त्यांना 16 महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश पलक जमादार यांनी हे निकाल दिले. तर दोन्ही दाव्यात महिलांच्या वतीने अॅड. झाकिर मणियार यांनी कामकाज पाहिले. पत्नीला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन देणारे पती पत्नीचा छळ करण्यासाठी मुद्दाम पोटगी देत नाहीत. मात्र आता पोटगी चुकवणे सोपे राहिले नाही, असा संदेश या निकालांतून जाईल. जेवढे महिने पोटगी थकविली तेवढे महिने तुरुंगात काढावे लागणार असल्याने यापुढे पती पोटगी चुकवणार नाही, अशा विश्वास अॅड. मणियार यांनी व्यक्त केला.