किरण शिंदे
पुणे : पुण्यातील फुलगावात राहणारा अमोलसिंग मुरली जाधव 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी धापा टाकतच लोणीकंद पोलीस ठाण्यात आला. ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता पत्नी ललिता हरवल्याचं त्यानं सांगितलं. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि मिसिंग असलेल्या ललिताचा शोध सुरू केला. मात्र अडीच महिने झाले तरीही ललिताचा ठाव ठिकाणा काही लागत नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी अमोलसिंगची चौकशी करण्यास सुरुवात केली. आणि इथेच तो गडबडला, फसला.. आणि उघडकीस आला भयंकर कट.बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या ललितासोबत अमोलने केवळ आई-वडिलांच्या आग्रहाखातर लग्न केले होते. मात्र दोघांचेही पटत नव्हते. त्यामुळे अमोलला घटस्फोट घ्यायचा होता. ललिता मात्र नकार द्यायची. शेवटी थंड डोक्याने अमोलने कट रचला. 28 ऑक्टोबर 2023 या दिवशी अमोलने ललिताला मांढरदेवीच्या दर्शनाला जायचे आहे असे सांगून सोबत घेतले. यासाठी त्यांने कॅब बुक केली होती. मांढरदेवीच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होता. इकडे दर्शनाला जायचं म्हणून ललिता आनंदी होती. तर तिकडे अमोल सिंगच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू होता.
मांढरदेवीला पोहोचल्यानंतर गाडी पार्किंगला थांबवून दोघेही पायी चालत वर निघाले. घाट रस्त्याने जात असताना कुणाचेही लक्ष आपल्याकडे नाही असं पाहून अमोलने खोल दरीत ललिताला ढकलून दिलं. बेसावध ललिता घरंगळत खाली गेली आणि वीस फूट खोल झाडाझुडपात जाऊन अडकली. जीव वाचवण्यासाठी ललिता आरडाओरडा करत असताना अमोल वीस फूट खोल खाली उतरला आणि तिच्याच साडी ने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर काही घडलंच नाही या अविर्भावात तो वर आला. मात्र तपासादरम्यान त्याच हे बिंग अखेर फूटलच.