- विजय सुराणा वडगाव मावळ : मावळात तब्बल बत्तीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. आकस्मिक मृत्यू झाला, संस्थेकडून मिळणारी पत्नीची देय रक्कम मिळविण्यासाठी शिक्षिकेच्या पतीला हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. पत्नीची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, ग्रॅच्युटी तसेच रजेचा पगार अशी शिक्षण संस्थेकडील देय रक्कम मिळविण्यासाठी वर्षभरापासून हेलपाटे मारणाऱ्या पतीवर हतबल होण्याची वेळ आली आहे.मावळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नंदिनी श्रीकांत राठोड या शिक्षिकेने तब्बल ३२ वर्षे सेवा केली. आजारी पडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. २२ जून २०१८ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च आला. पती श्रीकांत राठोड यांनी लाखो रुपये खर्च केले. ते कर्जबाजारी झाले आहेत. श्रीकांतसुद्धा शिक्षकी पेशातच आहेत. पत्नीचे निधन झाल्यानंतर वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल तसेच संस्थेकडून मिळणारी सेवानिवृत्तीची देय रक्कम मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना शासन दरबारी दाद दिली जात नाही. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद, पुणे या ठिकाणी वेळोवेळी जाऊन अर्ज दिले, पाठपुरावा केला; मात्र अद्याप देय रक्कम मिळू शकली नाही. पत्नीची साथ सुटली़ तब्येत साथ देत नाही़ पायाने चालता येत नाही, अशा अवस्थेत आणखी किती हेलपाटे मारायचे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.>मृत्यू झालेल्या शिक्षिका नंदिनी यांच्या सेवानिवृत्तीची देय रक्कम मिळण्यासाठी त्यांचे पती श्रीकांत पंचायत समितीकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांची फाईल जिल्हा परिषदेकडे पाठवली होती. काही कागदपत्रांची कमतरता होती. त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. त्या कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा फाईल पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल.- मंगल वाव्हळ, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, मावळ
शिक्षिकेच्या आकस्मिक मृत्यूनंतर थकीत रकमेसाठी पतीचे हेलपाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 2:06 AM