"कोणाच्याही बोलण्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही", विरोधकांच्या बोलण्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:52 PM2021-09-21T13:52:54+5:302021-09-21T13:53:14+5:30
मला काय करायचंय कोण काय बोललं त्याचं, मी भला, माझं काम भलं असं उत्तर देऊन बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
पुणे : कोणीही काहीही बोलत बसतील, त्यांच्या बोलण्यावर बोलायला मला मोकळा वेळ नाही, भरपूर कामं आहेत असं म्हणत विरोधकांच्या बोलण्यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं आहे. पुण्यात पत्रकारांनी त्यांना किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील या विषयाबद्दल त्यांना प्रश्न विचारले होते. त्यावर मला काय करायचंय कोण काय बोललं त्याचं, मी भला, माझं काम भलं असं उत्तर देऊन बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी सकाळी कार्यकारिणीची बैठक झालीज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, ग्रुहमंत्री दिलीप वळसे, जलसंधारण मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी बोलणं टाळलं. आणि गाडीत बसून ते लगेच मुंबईकडे रवाना झाले.
बैठकीनंतर शरद पवार लगेचच गाडीत बसून निघून गेले. अजित पवार पत्रकारांबरोबर बोलतील असे अपेक्षित होते, मात्र आज पत्रकारांबरोबर बोलायचेच नाही असे ठरवून आल्याप्रमाणे पवार यांनी ठामपणे काहीही बोलायला नकार दिला. जयंत पाटील बोलण्यास तयार झाले होते, मात्र पवार यांनी त्यांना चला जयंतराव म्हणत गाडीत बसण्यासाठी बोलावले. ते गेल्यावर दिलीप वळसे यांनीही दादा नाही बोलले, मी काय म्हणणार असे म्हणत गाडीकडे पावले वळवली व तेही निघून गेले.
अजित पवार यांच्या नकारामुळे कोणीही मंत्री न बोलताच निघून गेले. नंतर आलेल्या आमदार रोहित पवार यांनीही अजित दादा नाही बोलले, मी काय बोलणार, मला तर विषयही माहिती नाही असे म्हणत निघून जाणेच पसंत केले.