पुणे : ओला इलेक्ट्रिक दुचाकीच्या खरेदीसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एक लाख ३४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम इलियास (रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सुहास सदाशिव शिंदे (वय ४०, रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ओला डॉट कॉम या संकेतस्थळावर ४९९ रुपये भरून इलेक्ट्रिक दुचाकीची खरेदीसाठी नोंदणी केली होती.
शिंदे यांना २१ जानेवारी रोजी अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. मी ओला कंपनीतून बोलत आहे. तुम्ही दुचाकीसाठी नोंदणी केली आहे. गाडीच्या डिलिव्हरीसाठी बँक खात्यावर १ लाख १९ हजार ५०० रुपये पाठवा, असे सांगण्यात आल्यानंतर शिंदे यांनी नेटबँकिंगद्वारे रक्कम पाठवली. त्यानंतर विमा आणि परिवहन नोंदणीसाठी १४ हजार ७०० रुपयांची मागणी केली. शिंदे यांनी ही रक्कम ॲपद्वारे पाठवली. काही दिवसांनंतर दुचाकी न मिळाल्याने तसेच क्रमांकाशी संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. शिंदे यांनी गुलाम इलियास या व्यक्ती विरुद्ध आणि बंधन बँक (मधुबनी शाखा, बिहार) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.