पी. चिदंबरम, अरुण जेटली यांची भाषणे आवडतात : युवराज संभाजीराजे छत्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:57 PM2017-12-11T17:57:15+5:302017-12-11T18:02:45+5:30
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना फायद्याचा आहे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
पुणे : वकिली पेशा हा उत्तम व हुशारीचा पेशा आहे. पूर्वी वकील म्हणजे हुशार व्यक्ती, न्यायालयात खटला चालविणारे असा अर्थ होत असे. परंतु आज त्याचा फायदा राजकारणात देखील होताना दिसतो. राज्यसभेत बोलताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. त्यांची मांडणी, बोलण्याचे कौशल्य उत्तम आहे. हे दोघेही अर्थमंत्री असले तरी त्यांनी वकिलीचा अभ्यास केला आहे. त्यामुळे वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना सर्वार्थाने फायद्याचा आहे, असे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात ज्येष्ठ वकील अॅड. विनायक करकंडे यांंच्या पासष्टीपूर्ती सोहळ्यात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पत्नी भाग्यश्री करकंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. राज्याचे माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. के. आर. शहा, नियती शहा, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, नगरसेविका अश्विनी कदम, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दौंडकर, प्रशासकीय शिक्षण अधिकारी दीपक माळी, अनिल पायगुडे, अजय पाटील, वडझिरे ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी औटी, बार कौन्सिलचे सदस्य हर्षद निंबाळकर उपस्थित होते. याशिवाय पुणे बार असोसिएशन, लॉयर कन्झुमर सोसायटी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, शिवाजी मराठा संस्था यांच्यावतीने देखील अॅड. विनायक करकंडे यांचा सन्मान करण्यात आला.
शशिकांत सुतार म्हणाले, की करकंडे हे पेशाने वकिल असले तरी दोन वाद होणाºया संस्थांच्या बाजूने ते असायचे आणि त्या संस्था पुन्हा एकत्रित येवून काम कशा करतील, यासाठी ते प्रयत्न करायचे. करकंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत अनेक माणसे जोडली त्यांचा हा प्रवास आजच्या युवकांसाठी आदर्श ठरेल व युवकांना त्यांनी केलेल्या कायार्ची प्रेरणा मिळेल.
अॅड. के. आर. शहा म्हणाले, की माणूस जीवन जगताना ते कसे जगतो हे महत्त्वाचे नाही, तर त्याने आयुष्यात काय कमाविले आहे हे महत्त्वाचे आहे. करकंडे जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातात काही नसताना त्यांनी गरीबीतून विश्व उभे केले. त्यांच्या कार्यातून त्यांनी अनेक माणसे जोडली. कोणतीही गोष्ट हाती घेतली तर ती पूर्णत्वाला घेऊन जाण्याची जिद्द त्यांच्या अंगी आहे. स्वमेहनतीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले आहे, त्यामुळे त्यांचा वानप्रस्थ सुखकारक होईल, असेही त्यांनी सांगितले. सन्मानाला उत्तर देत अॅड. विनायक करकंडे म्हणाले, की पुण्यात १९७० साली जेव्हा आलो तेव्हा हातगाडी ओढण्याचे काम करीत होतो. तेव्हा अनेक व्यक्ती भेटल्या, त्यामुळे निरखून पारखून मैत्री करणे कधी जमलेच नाही म्हणून आजमितीस अनेक माणसे जोडली गेली. पुणे शहराने मला विद्या, उत्तम ज्ञान, संपत्ती, सुख आणि जिव्हाळ्याची माणसे दिली. यापुढील १० वर्षात विद्यार्थ्यांची मानसिकता घडविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री करकंडे यांनी आभार मानले.