राजानंद मोरे-पुणे : ‘लेकरा तुझ्यातच माझ्या विठ्ठलाला पाहिले...संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या बसरुपी पालखीचे सारथ्य करणाऱ्या चालकाच्या गळ्यात पडून प्रत्यक्ष विठु माऊलीला भेटल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या एका ८० वर्षीय आजीबाईंची ही भावना... ‘हे बोल ऐकून धन्य झालो. हा आमच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. एसटीमधील पाच वर्षांच्या वारकरी सेवेचे सार्थक झाले,’ असे नतमस्तक होत संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या बसरुपी पालखी रथाचे सारथ्य करणारे तुषार काशीद व शहाजी खोटे यांनी आपली भावना व्यक्त केली.विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या. तसेच त्याच बसने या पादुका पुन्हा परत आणण्यात आल्या. या दोन्ही बसरुपी पालखी रथाचे सारथ्य केले अनुक्रमे तुषार काशीद व शहाजी खोटे यांनी. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान देहू-आळंदी येथून पंढरपुरपर्यंत बसने वारकऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी इतर चालकांप्रमाणे त्यांच्यावरही यायची. त्यांच्या सेवेतच विठ्ठल दर्शन घडायचे. पण यंदा थेट रथाचे सारथ्यच करण्याचे भाग्य मिळाल्याचे ते सांगतात.------------काशीद हे मुळचे बारामती तालुक्यातील शिरसणे गावचे. ते एसटीमध्ये पाच वर्षांपुर्वी पिंपरी चिंचवड आगारात रुजू झाले. त्यांचे चुलते व चुलती दरवर्षी वारी करतात. आता चिखली येथे कुटूंबासह राहतात. ध्यानीमनी नसताना या बसवर संधी मिळाली. खुप भाग्यवान ठरलो. आळंदीतून निघाल्यापासून पुन्हा परतेपर्यंत ठिकठिकाणी वारकरी दर्शन घेत होते. फुलांचा वर्षाव करत होते. बसमधील भजन-कीर्तन, विठ्ठलाच्या जयघोषाने हा प्रवास कधी संपला कळलेच नाही. आळंदीत एका आजी रडत-रडत गळ्यात पडल्या आणि तुमच्यातच विठ्ठल बघितल्याचे म्हणाल्या. हे ऐकून धन्य झालो.--------------मुळचे बीड जिल्ह्यातील मुगगावचे असलेले शहाजी खोटे पाच वर्षांपासून तळेगाव आगारात कार्यरत आहेत. त्यांचे कुटूंब मुगगावमध्येच आहे. त्यांनाही संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेली बस घेऊन पंढरपुर जायचे, हे अचानकच समजले. ते सांगतात, आमची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पंढरपुरला जायचे हे कळाले. तिथेच ऊर भरून आला. आई-वडील दिंडीसोबत पालखीला जायचे. मी फक्त एसटीने वारकऱ्यांना न्यायचो. पण यंदा संतांच्या पादुका नेण्याचे भाग्य लाभले. बसमध्ये भजन-किर्तनात मीही तल्लीन होत होतो. पंढरपुर आणि देहूमध्येही अनेकांनी माझेही दर्शन घेतल्याने सेवेचे सार्थक झाले. हा प्रवास स्वप्नवत होता.--------------एसटीने एवढी वर्ष वारकरी सेवा केली त्याचे सार्थक झाले आहे. आपल्या वाहनांतून संतांच्या पादुका जाणे, ही भाग्याची गोष्ट आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय ही वारी पार पडली.- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ.
तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 7:16 PM
विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या...
ठळक मुद्दे आपल्या वाहनांतून संतांच्या पादुका जाणे, ही भाग्याची गोष्ट