पुणे : समाजात सामाजिक न्याय असतो. समूहात तो नसतो. आपण समूहात राहतो की समाजात याची जाणीव अद्याप लोकांना नाही. महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते. ‘उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. प्रा. निवळीकर म्हणाले, ‘गाडगेबाबा हे कर्ते सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीत त्यांचे आयुष्य बांधले गेले होते, त्यांनी कीर्तनातून जाणीव जागृती केली. बौद्धिक हुकूमशाही जास्त घातक आहे, याची जाणीव असणाऱ्या गाडगेबाबांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचे विचार परखड असूनही, त्यांना विरोध झाला नाही. कारण त्यांच्या आचार उच्चार आणि विचारात एकवाक्यता होती. गाडगेबाबांना केवळ परिसराची स्वच्छता अपेक्षित नव्हती, त्यांना समाजमनाची वैचारिक स्वछता करायची होती. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
उपेक्षितांविषयी वाटणारी कणव हा माटे आणि गाडगेबाबांना जोडणारा समान धागा आहे. श्री. म. माटे हे थोर समाजशिक्षक होते. त्यांचे लेखन आणि जीवन यात भेद नव्हता. त्यांच्या विदवत्तेला कृतीची जोड होती आपल्या हयातीतली २० वर्षे त्यांनी दलित बांधवांच्या शिक्षणासाठी वेचली. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले सामर्थ्य पणाला लावले माटे यांच्या कार्याचे विस्मरण आजच्या समाजाला झाले आहे. - प्रा. मिलिंद जोशी