जादा भाडे आकारल्यास करा शासनाकडे थेट तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:17 AM2018-04-30T04:17:47+5:302018-04-30T04:17:47+5:30
गर्दीच्या हंगामात खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
पुुणे : गर्दीच्या हंगामात खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता यासंदर्भात प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित केला आहे. या निर्णयानुसार आता गर्दीच्या हंगामात खासगी प्रवासी वाहनधारकांना एसटी महामंडळाच्या बसच्या तिकिटापेक्षा दीडपटच तिकीट आकारता येणार आहे. दरम्यान, जर एखाद्या प्रवासी वाहनांमध्ये यापेक्षा जास्त भाडे आकारले गेले तर संबंधित वाहनाचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. खासगी प्रवासी वाहनधारकांकडून गर्दीच्या काळात प्रवाशांची होणारी लुबाडणूक आता थांबणार आहे. तसेच तक्रारी विभागाच्या ६६६.३१ंल्ल२स्रङ्म१३ूङ्मेस्र’ं्रल्ल३२.ेंँंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरदेखील नोंदविता येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
उन्हाळी सुटी, दिवाळी सुटी, गणेशोत्सव, होळी, नाताळ सुटी या गर्दीच्या काळामध्ये खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे या वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिले होते. त्यानुसार हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुणे येथील केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी-सुविधांचा अभ्यास करून अहवाल सादर केला.