पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी होत असून पावसाळा लांबल्यास पुण्यावर जलसंकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.वाढते तापमान आणि त्यामुळे होणºया बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. पुण्यासाठी महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. कागदावर हा साठा दिसत असला तरी उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू आहे. त्याचबरोबर कालव्याच्या लगतच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याची कसरत महापालिका आणि जलसंपदा विभागाला करावी लागणार आहे.सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. साधारण १५ जुलैपर्यँत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. मात्र पावसाचा अंदाज बांधणे कठीण असल्याने यंदा ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा पाटबंधारे विभागाचा विचार आहे. सध्या सुरु असलेले उन्हाळी आवर्तन अजून चार ते पाच दिवस चालणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पाण्याची सद्यस्थिती बघून पुढील आवर्तन सोडायचे की नाही यावर निर्णय घेण्यात येईल असे पाटबंधारे खात्याच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पुण्याला पाणीपुरवठा करणाºया टेमघरची क्षमता ३.७१ टीएमसी, पानशेतची क्षमता १०.६५ टीएमसी, वरसगावची क्षमता १२.८२ टीएमसी,खडकवासला धरणाची क्षमता १. ९७ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये पाणी कमी होत असून खडकवासला वगळता बाकी धरणांनी तळ गाठला आहे. टेमघर धरणात एकूण क्षमतेच्या शून्य टक्के पाणी आहे.या धरणाची दुरुस्ती करण्याच्या कारणामुळे या धरणातील पाणी लवकर संपवण्यात आले आहे. पानशेत धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्के म्हणजे ६.४२ टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर वरसगाव धरणात अवघे १ टक्के पाणी शिल्लक असून सर्वात लहान खडकवासलाधरणात ९० टक्के म्हणजे १.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.\पावसाचा अंदाज अनिश्चित असल्याने यंदा १५ जुलै ऐवजी ३० जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न असेल. सध्या पुणे महापालिका १३५० ते १४०० एमएलडीच्या दरम्यान प्रतिदिन पाणी वापरते. त्यामुळे त्यांनी पाणी बचत करण्याची गरज आहे. तसे झाल्यास पाण्याची टंचाई जाणवणार नाही.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला धरण साखळी
पावसाळा लांबल्यास पुण्यात जलसंकट, धरणातील पाणीसाठा खालावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:34 AM