पुणे : भाजप बरोबरचा घरोबा संपवून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. हा घाव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेत सातत्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. मात्र, काल दिल्लीत उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात विशेष बैठक झाली अन् राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आलं. मात्र, शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नरेंद्र मोदींनी आदेश दिले तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू असे सांगत एकप्रकारे शिवसेनेलाच थेट 'ऑफर' दिली आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. त्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसेच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचं म्हणणं आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर १८ महिन्यांपूर्वीच सरकार आलं असतं. मात्र,मोदीजींनी सांगितलं तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. आणि नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल तर करू. पण जरी तसं काही घडलं तरी निवडणुका ह्या वेगळ्याच लढविल्या जाणार आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारची मराठा आरक्षणावरून धूळफेक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या भेटीवर आणि केलेल्या मागण्यांसंबंधी देखील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले,राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक सुरु आहे. केंद्र सरकारच्या हातात मराठा आरक्षणासंबंधी काहीच नाही. मात्र, राज्य सरकारला समिती स्थापन करून प्रचंड सर्व्हे करून सर्वात अगोदर मराठा समाजाला मागास ठरविण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. याच दरम्यान,राज्य सरकारने भाजपच्या सत्ताकाळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या होत्या त्या तरी द्यायला हव्यात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने तुमचे हात कुठे बांधलेत ? असे मत पाटील यांनी व्यक्त केले,