पुणे : अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी निकषात बसत नसल्यास स्वत: बाहेर पडण्यासाठी ‘गिव्ह इट अप’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही खोट्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून ४२ रुपये किलो या दराने गव्हाची, तर ३२ च्या दराने तांदळाची वसुली केली जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यात आतापर्यंत ५२२३ जणांनी रेशनवरील धान्याचा हक्क सोडला आहे.
जिल्ह्यात रेशनचे २६ लाख लाभार्थी
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य योजनेत २६ लाख ७१ हजार १५६ लाभार्थी आहेत. तर दोन्ही योजना मिळून ५ लाख ८४ हजार ९०२ रेशनकार्ड आहेत.
काय आहे ‘गिव्ह इट अप’ उपक्रम
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत सलवतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेण्याची आवश्यकता नसल्यास असे लाभार्थी ते नाकारू शकतात.
या लाभार्थ्यांनी भरावा अर्ज
- ज्या कार्डधारकांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असल्यास
- कुटुंबामध्ये दोन, तीन, चारचाकी, किंवा ट्रॅक्टर असल्यास
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये असल्यास
- पाच एकरपेक्षा जास्त शेती असल्यास (बागायती किंवा जिरायती)
- पक्के घर असल्यास
अर्ज कसा भराल?
या योजनेत सहभाग घेण्यासाठी जवळच्या रेशन धान्य कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. तसेच रेशन दुकानांमध्येही अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
१५ सप्टेंबरपर्यंतची मुदत
या योजनेत सहभाग घेण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.
धान्याची रक्कम वसूल करणार
त्यानंतरही खोट्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडून ४२ रुपये किलो या दराने गव्हाची, तर ३२ च्या दराने तांदळाची वसुली केली जाणार आहे.
गिव्ह इट अप अंतर्गत आतापर्यंत पाच हजार २३३ शिधापत्रिकाधारकरांनी धान्य सोडत असल्याचा अर्ज भरून दिला आहे. जे व्यक्ती धान्य सोडू शकतात, त्यांनी अर्ज भरून द्यावा.
- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे