"IG लेवलपर्यंत पॅकेट संस्कृती असेल तर...", पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रकाश आंबेडकरांचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 04:27 PM2023-02-02T16:27:57+5:302023-02-02T16:40:20+5:30
नेमणूक झालेले पोलीस अधिकारी आधी पाकीट गोळा करतात अन् नंतर..
पुणे/किरण शिंदे : पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत आणि पुणेपोलिसांच्या एका निर्णयावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सकाळीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुणे पोलिसांच्या कारभारावरून पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. आयजी लेवलपर्यंत जर पॅकेट संस्कृती असेल तर असे प्रकार घडणारच असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. आंबेडकर पुण्यात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, सिस्टीम कोलॅप्स होत चालली आहे यात दुमत नाही. नेमणूक होताना जर आयजी लेव्हलपर्यंत पॉकेट संस्कृती असेल तर नेमणूक झालेला कोणताही पोलीस अधिकारी सर्वात आधी पॅकेट गोळा करण्यात लागतो आणि नंतर कायदा सुव्यवस्था बघतो. तत्कालीन पोलीस आयुक्त प्रश्न शुक्ला यांच्या बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले रश्मी शुक्ला यांनी अनेकांचे फोन टॅप केले. याप्रकरणात आतापर्यंत बरीच माहिती आली आहे. मात्र ती अजूनही सार्वजनिक केली जात नाही. याप्रकरणात कारवाईसुद्धा केली जात नाही. त्यामुळे फोन टॅपिंग वैध की अवैध अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांना पकडून देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी " बक्षीस योजना" जाहीर केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी पकडल्यास त्यांना एक हजारापासून ते दहा हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. पोलिसांच्या या निर्णयावर आता चहूबाजूने टीका करण्यात येत आहे.