चूक असेल तर शासन झालेच पाहिजे - अजित पवार यांची पूजा चव्हाण प्रकरणाबाबत वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:32 AM2021-02-20T04:32:18+5:302021-02-20T04:32:18+5:30
शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आजवर ज्या लोकप्रतिनिधीवर आरोप झाले ते लोक पदापासून बाजूला झाले. ...
शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आजवर ज्या लोकप्रतिनिधीवर आरोप झाले ते लोक पदापासून बाजूला झाले. याविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी लालबहादूर शास्त्री यांचा दाखला देत आरोप झालेल्या मंत्र्याचे नाव न घेता त्यांच्याबाबत वक्तव्य केले. रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करीत, यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहतच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून अजित पवार यांनी संबंधितांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी असा आरोप केला होता की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळ्यात अडकवले याविषयी विचारल्यानंतर पवार यांनी यामध्ये तथ्य असेल तर कारवाई नक्की होईल. आता ज्या गोष्टी झाल्या त्या उगाळणं चांगलं नाही, असे सांगून पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
पेट्रोल इंधन दरवाढीबाबत मागच्या सरकारवर खापर फोडले जात आहे, त्याविषयी पवार म्हणाले, एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यात अर्थ नाही. परभणीत पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे गेलेय. ते कमी झाले पाहिजे. भाजपच्या पक्षातील लोकांना पण हे वाटत आहे. पण कुणी बोलू शकत नाही. ज्या वेळी अर्थसंकल्प मांडेन त्यावेळी काय कमी होईल आणि वाढेल ते सांगेन, असे पवार बोलले.
------------