कार्यकर्ता जगवायचा असेल तर काँग्रेसला स्वबळावरच लढावंच लागेल; नाना पटोलेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 04:46 PM2021-07-23T16:46:40+5:302021-07-23T16:50:35+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावरच लढणार : नाना पटोलेंचा पुनरुच्चार
पुणे: कार्यकर्ता जगवायचा असेल तर स्वबळावरच लढावे लागेल ही भूमिका श्रेष्ठींना पटली, त्यांनी संमती दिली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावरच लढणार असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महापालिकेचा प्रभाग दोनचा राहिल असेही ते ठामपणे म्हणाले.
काँग्रेसच्या आजीमाजी नगरसेवकांची बैठक शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी त्यांंनी स्वबळाची मागणी तूमच्यासाठी केली. ती राहुल गांधींनी मान्य केली. आता जबाबदारी तुमची आहे, एक राहा, प्रामाणिक राहा विजय आपोआप होईल असा सल्लाही त्यांनी दिला. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, ऊल्हास पवार पालिकेतील गटनेते आबा बागूल तसेच पक्षाचे आजीमाजी नगरसेवक, आमदार, शहरातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, राज्यातच नाही तर आता देशातच राजकीय बदल होणार आहे. महापालिकेचा तर विषयच नाही. काँग्रेस हवी ही आता जनतेचीच भावना आहे. ल़ोक त्यांना कंटाळलेत. तुम्ही आता पात्र व्हायला हवे. पक्ष महत्वाचा हे नेहमी लक्षात ठेवा. प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्व मदत करू, पण काम करणारे दिसायला हवं. केंद्र सरकारच्या धोरणाचा झळ सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. सर्व क्षेत्रात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. याच मुद्द्यांवर आपल्याला त्यांना हरवायचं आहे.
उपस्थितांना त्यांनी अनेक सुचना केल्या. पुणे शहराला वेळ द्या या मागणीला प्रतिसाद देत हवा तेवढा वेळ देईल, तूमच्याकडे अनूभवींची संख्या आहे, त्यांचा सल्ला घ्या, आतापासूनच निवडणूकीचे नियोजन करा असे त्यांनी सांगितले.