पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणारे नागरिक रात्री साडेदहानंतर थांबू नये, असे परिपत्रकच विद्यापीठाने काढले आहे. याचबराेबर रात्री १२ नंतर पर्याप्त व आवश्यक कारण असेल तरच तशी नाेंद करून प्रवेश दिला जाणार आहे.
परिपत्रकानुसार जोशी (खडकी) गेट, आयुका गेट आणि मुख्य (पुना) गेट या तिन्ही प्रवेशद्वारातून होणाऱ्या वाहतुकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सुरक्षेचे कारण देऊन विद्यापीठाला बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे. विद्यापीठ हे मुक्त केंद्र असले पाहिजे, पण काही दिवसांपासून प्रशासन मुख्य प्रश्न बाजूला ठेवून गौण गोष्टीवर जास्त लक्ष देत आहे, असा आराेप विद्यार्थ्यांनी केला आहे.
प्रवेशद्वारनिहाय अशी असेल वेळ
१) आयुका संस्थेशेजारील प्रवेशद्वार पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत
२) जोशी प्रवेशद्वार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत
३) मुख्य प्रवेशद्वार पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत
विद्यापीठ प्रशासनाने भोजन प्रश्न, शुल्कवाढ, वसतिगृह यावर लक्ष दिले पाहिजे. तसेच अनेक पदव्युत्तर पदवी व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र नाही, त्यामुळे अनेकांना कार्यक्रमात प्रवेश नाकारला जातो. यावर प्रशासनाने काम करण्याची गरज आहे.
- राहुल ससाणे, विद्यार्थी व शहर कार्याध्यक्ष, विद्यार्थी दलित पँथर
विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशद्वाराच्या वेळेबाबतचे परिपत्रक काढले आहे. मात्र याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये. विद्यापीठ प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार २४ तास सुरू ठेवावे.
- तुकाराम शिंदे, संशोधक विद्यार्थी
विद्यापीठात मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे असताना वेळेचे बंधन का घालण्यात येत आहे, हे कळत नाही. शुल्कवाढ, वसतिगृह, शिष्यवृत्ती, कमवा व शिका आदींवर प्रामुख्याने काम करण्याची गरज आहे.
- सचिन पांडुळे, शहराध्यक्ष, युक्रांद
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अभ्यागतांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वार सोडून इतर दोन्ही ठिकाणी पूर्वीचीच वेळ आहे. विद्यार्थ्यांना हा नियम लागू नाही, फक्त अभ्यागत यांच्यासाठी नियम आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ