डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 09:44 AM2023-12-12T09:44:55+5:302023-12-12T09:45:27+5:30
अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे तर रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था
पुणे: साेसायटी, शासकीय कार्यालये, व्यावसायिक जागा येथे डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधात्मक विभागाने यावर्षी २ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, आतापर्यंत डेंग्यूचे ३ हजार २३१ संशयित तर अडीचशे रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत.
पुणे शहरात जानेवारीपासून आतापर्यंत २४९ पाॅझिटिव्ह डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील आहे. त्यापैकी सर्वाधिक ७० रुग्ण हे सप्टेंबर महिन्यात तर त्याखालाेखाल ५७ रुग्ण ऑक्टाेंबर महिन्यात आढळून आले आहेत. तर ऑगस्ट महिन्यात ४७ रुग्ण आढळले हाेते. उर्वरित महिन्यातील रुग्णांची आकडेवारी ही ३५ च्या आत असून एप्रिल, मे आणि जून महिन्यांत शून्य रुग्ण आढळून आले हाेते, अशी माहिती कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डाॅ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
माणसाला डेंग्यूचा संसर्ग हा विषाणू बाधित एडिस एजिप्टी डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानव -डास-मानव असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या, फ्रीज, कुलर व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या मात्र उघड्या असलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डासाने चावा घेतल्यानंतर याची लक्षणे ५ ते ६ दिवसांच्या अधिशयन काळात दिसून येतात.
रोगांची सर्वसाधारण चिन्हे व लक्षणे
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे इ. रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्रवित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील हातपाय, चेहरा व मान यावर आलेल्या पुरळांवरून केली जाते. याची चाचणी ही रक्तचाचणीद्वारे केली जाते.
खास औषधोपचार नाही
डेंग्यू तापावर निश्चित असे औषधोपचार नाहीत, तथापी रोग लक्षणानुसार उपचार करावे लागतात. दरम्यान, पपईच्या पानाचा रसामुळे काही प्रमाणात प्लेटलेट्स वाढतात, असाही डाॅक्टरांचा अनुभव आहे.
चिकुनगुनियाचे ३८ पेशंट
शहरात चिकुनगुनियाचे ३८ पेशंट आढळून आलेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक १२ पेशंट हे ऑक्टाेबर महिन्यात तर सप्टेंबर महिन्यात ९, तर ऑगस्ट व नाेव्हेंबर महिन्यात प्रत्येकी ७ पेशंट आढळून आले आहेत.