विनाकारण घराबाहेर पडल्यास खिशात घालावा लागेल हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:11 AM2021-04-03T04:11:21+5:302021-04-03T04:11:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोेरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात शनिवारपासून पुनश्च (दि. ३ ) सायंकाळी सहा वाजल्यापासून कडक निर्बंध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोेरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात शनिवारपासून पुनश्च (दि. ३ ) सायंकाळी सहा वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीचा आदेश काढण्यात आला. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांकडून सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ४ हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विनाकारण मोटारीसह दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे स्वयंशिस्तीचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. याकरिता नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये मेडिकल, दवाखाने सुरू राहणार असून, उर्वरित सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. विनापरवानगी संचार, मास्क न वापरणे, वाहनांमधून संचार करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यांत कोरोनाचा धोका टळला नसून दिवसेंदिवस बाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालून नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.