इंदापूर : मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांना भाजप निवडून येईल असा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. मात्र जर एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते,अशा शब्दात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधकांना चिमटा काढला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुका विभागीय कार्यालयाचे उदघाटन शनिवार ( दि. ६ ) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, जे भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे. अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. बावीस गावांच्या शेती पाण्याचा प्रश्न तसेच लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर कॅनॉलची वहन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना अधिकचे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल. याकडे लक्ष दिलेले आहे. शेटफळ हवेली तलाव याची उंची वाढवणे व या तलावाची उर्वरित राहिलेली कामे पूर्ण करणे, याकडेही प्रामुख्याने माझे वैयक्तिक लक्ष असून, शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घेतली गेली आहे.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, पुणे जिल्हा परिषद सदस्या वैशाली प्रतापराव पाटील, प्रविण माने, बँकेचे व्हाईस चेअरमन अर्चना घारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विचाराच्या ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत मात्र प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य ने आपल्या गावचा विकास सर्वांगीन कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारच्या माध्यमातून पंचवीस पंधरा साठी प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला जाईल. तर इंदापूर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मोठ्या ताकतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राबून घेतील, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.