बेकायदेशीर रस्ते खोदाईकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 02:14 AM2018-11-15T02:14:03+5:302018-11-15T02:14:18+5:30
दिवाळीची सुट्टी : शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रस्ते खोदाई
पुणे : नोव्हेंबर महिना उजाडला तरी महापालिकेकडून अद्यापही शहरात विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्ते खोदाईला परवानगी दिलेली नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बेकादेशीरपणे रस्ते खोदाई सुरु झाली असून, याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे परवानगी द्यायची नाही आणि दुसरीकडे बेकायदेशीर खोदाईकडे दुर्लक्ष करायचे. यामुळे महापालिकेचे मात्र कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मात्र बुडत आहे.
शहरामध्ये विविध प्रकारच्या सेवावाहिन्या टाकण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध कंपन्यांना रस्ते खोदाईची परवानगी दिली जाते. दरवर्षी १ आॅक्टोबरपासून रस्ते खोदाई करण्यास सुरुवात होते. सध्या महापालिकेककडे विविध मोबाईल कंपन्यांबरोबर महावितरण, एमएनजीएल या कंपन्यांकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. यासाठी महापालिकेकडून रस्ते खोदाई शुल्क देखील भरून घेतले जाते. परंतु यंदा शहर सुधारणा समितीने या उघड्यावर केबल वाहिन्या टाकण्याबाबत धोरण तयार होईपर्यंत रस्ते खोदाईस परवानग्या देऊ नये, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला रस्ते खोदाईच्या परवानग्या दिलेल्या नाहीत. त्यात आता केवळ महावितरण आणि एमएनजीएल या कंपन्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या मोबाईल कंपन्याकडून पालिकेला खोदाईच्या माध्यमातून उत्पन्न मिळते.
त्यांना आता जवळपास दीड महिना होत आला असला तरी अद्याप परवानग्या देण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रकल्पांची कामे रखडली आहेत, तर दुसरीकडे पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. या सगळ्या कारभारामुळे शहरात आता केबल टाकण्यासाठी अनधिकृतरीत्या खोदाई सुरु झाली असल्याचे समोर आले आहे.
लवकरच केबल धोरण निश्चित करणार
महापालिकेतील पदाधिकारी सध्या परदेश दौऱ्यावर असून, पदाधिकारी आल्यानंतर त्वरित उघड्यावरील केबलचे धोरण निश्चित करण्यात येईल. त्यानंतर तातडीने संबंधित सर्व कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी परवानग्या देण्यात येतील. तसेच शहरात बेकायदेशीरपणे रस्ते खोदाई करणाºयावर कडक कारवाई करण्यात येईल.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख
बेकादेशीर रस्ते खोदाईसाठी
दिवाळी सुट्टीचा मुहूर्त
यंदा प्रथमच महापालिकेला सलग सहा दिवस दिवाळीची सुट्टी मिळाल्याने बहुतेक सर्वच अधिकारीवर्ग सुट्ट्यांच्या मूडमध्ये होते. याचा संधीचा फायदा घेत वानवडी भागातील भैरोबानाला ते क्रोमा शोरुमपर्यंत जवळपास १ किमी अंतरात बेकायदेशीरपणे रस्ते खोदाई करून केबल टाकण्यात आली. याबाबत तक्रार झाल्यानंतर महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने केवळ संबंधित कंपनीची केबल जप्त करण्याची कारवाई केली. संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ केली जात आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदाई होऊनदेखील स्थानिक अधिकाºयांनी पथ विभागाच्या प्रमुखांपासून ही माहिती लपविण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांचे बेकायदेशीर खोदाईस पाठबळ मिळत असल्याचे स्पष्ट झाले.