उबेर ॲपवरून बेकायदा बाईक टॅक्सी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:58+5:302021-02-05T05:00:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशात वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू असताना उबेर ॲपवरून बेकायदा बाईक टॅक्सी वापरून दिवसाढवळ्या वाहतूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशात वाहतूक सुरक्षा सप्ताह चालू असताना उबेर ॲपवरून बेकायदा बाईक टॅक्सी वापरून दिवसाढवळ्या वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन करत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आरटीओ प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. यात तातडीने लक्ष घालावे, असे निवेदन महाराष्ट्र कामगार सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना दिले आहे.
याबाबत महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोटर व्हेइकल अॅक्ट १९८८ प्रमाणे, महाराष्ट्र राज्यामध्ये दुचाकी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी नाही. प्रवासी वाहतूक करण्यासाठी आरटीओकडे वाहनांची प्रवासी नोंदणी करणे गरजेचे असते व वाहनानुसार तिथे टॅक्स भरावा लागतो. तसेच प्रवाशी वाहतुकीची नोंदणीची परवानगी असणाऱ्या वाहनांना पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते व खासगी वाहनांना काली पांढरी नंबर प्लेट असते. त्याव्यतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवाशांचा इन्शुरन्स काढणे, त्यांची आरटीओ मार्फत नियमित तपासणी होणे, चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणे, त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असणे अशा प्रकारच्या अनेक नियम मोटर व्हेइकल अॅक्ट प्रमाणे बंधनकारक आहे.
या सगळ्या नियमांचे उघड उल्लंघन करून उबेर ॲप गेले अनेक दिवस त्यांच्या ॲप सर्व्हिसेसवरून खासगी दुचाकी वाहनधारकांना टू व्हीलरवर प्रवासी वाहतूक करण्यास सांगत आहे. अशा प्रकारचे बदल त्यांनी त्यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये केले आहे. आपण रिक्षा बुक करण्यासाठी ते अॅप ओपन केले असता ते आता दोनचाकीचासुद्धा पर्याय देते. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. उबेर ॲपने असे बेकायदेशीर कृत्य केल्यावर अनेक शहरांमध्ये त्वरित कारवाई केली. परंतु पुणे व पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये गेले अनेक दिवस या गोष्टीचा मागमूस कोणालाही नाही असे दिसते किंवा जाणूनबुजून याकडे आरटीओ कणाडोळा करत आहे. यात तातडीने लक्ष घालून हा बेकायदेशीर प्रकार बंद करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.